उथळपेठचा सौरविकास इतर गावांसाठी ठरेल दिशादर्शक - आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

 



उथळपेठचा सौरविकास इतर गावांसाठी ठरेल दिशादर्शक - आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

◾उथळपेठ ठरले महाराष्ट्रातील सर्वाधिक घरांचे 'सौर ऊर्जा ग्राम'

◾180 घरांना मिळाला सौरऊर्जा योजनेचा लाभ

◾सौरग्राम उथळपेठ; विकास, ऊर्जा आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : उथळपेठ गावाने १०० टक्के सौरग्राम प्रकल्प यशस्वीरित्या राबवून राज्यातील शेकडो गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. उथळपेठचा सौर विकास इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. गावकऱ्यांचा सक्रीय सहभाग आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे भरीव आणि दर्जेदार विकासकामांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत १०० टक्के सौर ऊर्जित ग्राम उथळपेठ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी किशोर शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता संध्या चिवडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण तुराणकर, सहाय्यक अभियंता विनायक चव्हाण, सरपंच पलींद्र सातपुते, उपसरपंच भारतीताई पिंपळ,  सदस्य श्रीकांत बुरांडे, सुरेंद्र चिचघरे, अर्चनाताई चिचघरे, वर्षाताई वाढई मीनाक्षी बुरांडे, नंदकिशोर रणदिवे, अजय गोगुलवार, महेश टहलीयानी, दिलीप वावरे आदींची उपस्थिती होती.

आ. मुनगंटीवार म्हणाले,उथळपेठ गावकऱ्यांनी भरभरून प्रेम व सहकार्य केले आहे. याची जाणीव प्रत्येक विकासकामातून होते. इतर गावांना हेवा वाटावा अशी भरीव आणि दर्जेदार विकास कामे उथळपेठमध्ये करण्यात आली आहेत. उथळपेठ येथे २.५० कोटी रुपये खर्च करून भव्य ग्रामपंचायत इमारत व वाचनालय, २ कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते, उच्च दर्जाची अंगणवाडी, पांदण रस्ते, ड्रेनेज व्यवस्था तसेच गायमुख देवस्थानाचा पर्यटन विकास यांसारख्या सर्वांगीण कामांनी उथळपेठचा कायापालट साधला आहे. या यशानंतर पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावही १०० टक्के सौरग्राम करण्याचा निर्णय घेतला,असून उथळपेठचा सौरविकास इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘सौरग्राम साकारण्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. अनुदान मिळेपर्यंत काही रक्कम स्वतःकडून भरावी लागणार होती; मात्र ही अडचण दूर करण्यासाठी धनश्री पतसंस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केले. विशेष म्हणजे, सौरग्राम उभारणीचा हा पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी ठरला. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

उथळपेठच्या प्रेरणादायी यशानंतर आता पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा हे गाव 100 टक्के सौरग्राम करण्याचा निर्णय घेतला आहे.  सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय केला. मोदीजींच्या संकल्पात उथळपेठ हे गाव आता ऊर्जापेठ झाले आहे. उथळपेठचा प्रकाश आता इतर गावांनाही ऊर्जेचा नवा मार्ग दाखवेल, असा विश्वास यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, सर्व घरांवर 187 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनल उभारून 23 हजार युनिट वीज निर्मिती करत मुल तालुक्यातील उथळपेठ गावातील 180 घरांना सौरऊर्जेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेले सौरऊर्जेवर आधारित गाव म्हणून उथळपेठने राज्याच्या ‘सौर ऊर्जा ग्राम’ योजनेत मानाचे स्थान प्राप्त केले आहे. या  ऐतिहासिक यशाबद्दल उथळपेठचे सरपंच पलिंद्र सातपुते, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, विशेषतः उथळपेठ ग्रामवासीय तसेच विद्युत महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे  आमदार श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. या गावात उमा–अंधारी नदीवर बॅरेज उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात मुल व पोंभूर्णा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी अडवून शेतकऱ्यांना शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यापूर्वी चिंचाळा येथे पाच गावांसाठी संयुक्त पाणीपुरवठा/सिंचन योजना राबवून त्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी विधानसभेत ठाम आवाज

येथील शेतकरी प्रामुख्याने धान उत्पादक आहेत. धान नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. गत वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस मंजूर करून देण्यात आला. एका हेक्टरवरील धान उत्पादनासाठी होणारा खर्च आणि धान विक्रीतून मिळणारे उत्पन्न यामधील फरक अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मी संपूर्ण ताकदीने विधानसभेत हा मुद्दा मांडला. याचा मला अभिमान आणि समाधान असल्याची भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

गावकऱ्यांनी एकत्र येऊन दूध उत्पादन वाढवा

उथळपेठ व पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम हे दूध उत्पादक गाव आहे. मतदारसंघातील दूध उत्पादक गावांनी एकत्र येऊन दूध उत्पादन दहापटींनी वाढवण्याचा संकल्प करावा. या वाढीव दूध उत्पादनावर आधारित दुधापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंसाठी शासनाच्या माध्यमातून विशेष योजना आखण्यात येतील असेही आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.




Post a Comment

0 Comments