अखेर कावेरी कंपनी च्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल सत्याचा विजय - विक्रांत सहारे युवासेना जिल्हाप्रमुख

 





अखेर कावेरी कंपनी च्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल सत्याचा विजय - विक्रांत सहारे युवासेना जिल्हाप्रमुख

◾कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

◾अल्पवयीन मुलांवर असे प्रकरण घडल्यास आधी युवासेना त्यासोबत राहणार - विक्रांत सहारे 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने याच कंपनीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आदेशानंतर प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हे दाखल झाल्याने सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.

डिसेम्बर २०२४ मध्ये अल्पवयीन मुलाला रोजगार देतो म्हणून तत्कालीन एचआर गिरी सिद्धापल्ली याने २० हजार रुपये घेत अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर ठेवले. कावेरी कंपनी वेकोलीमध्ये माती उत्खनन करण्याचे काम करते. काही दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी हे सुट्टीवरून परतल्यावर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला कार्यालयात बोलावून घेतले व त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हि बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी त्या मुलाला दिली.

अल्पवयीन मुलाला रेड्डी यांनी कामावरून कमी केली मात्र त्याला कामाचा मोबदला दिला नाही, याबाबत अल्पवयीन मुलाने जिल्हा बाल संरक्षण समितीकडे दाद मागितली होती. याबाबत मुलगा व त्याच्या आईचे बयान नोंदविण्यात आले, संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यावर जिल्हा बाल संरक्षण समितीने कावेरी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला.

३ मे ला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१ (२), ३ (५), अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ कलम ७५, ७९, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन कायदा १९८६ कलम ३ (A), १४ अंतर्गत एचआर हेड गिरी सिद्धापल्ली व कावेरी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.  

नेमकं प्रकरण काय?

अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर रुजू केले, त्यानंतर त्याला व्यवस्थापक रेड्डी यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, पीडित मुलाच्या आईने न्यायासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांचे दार ठोठावले, सहारे यांनी आई व मुलाला सोबत घेत कंपनी व्यवस्थापक रेड्डी यांना जाब विचारला असता तुम्हाला जे करायचं आहे ते करा असे सुनावले, सहारे यांनी कामगार आयुक्त व बाल संरक्षण समितीकडे तक्रार दाखल केली. 

तक्रार का दाखल केली म्हणून रेड्डी यांनी सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला, मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने खंडणीचा कसलाही प्रकार घडला नसल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केल्याने रेड्डी यांची गोची झाली. यानंतर सहारे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत अल्पवयीन मुलाला न्याय देण्यासंदर्भात प्रयत्न केले, अखेर ३ मे रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल झाले.

अल्पवयीन मुलांवर असे प्रकरण घडल्यास आधी युवासेना त्यासोबत राहणार - विक्रांत सहारे 

अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणात रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हा सत्याचा विजय आहे, आम्ही प्रकरण उचलले म्हणून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला मात्र आम्ही मागे हटलो नाही, सतत पाठपुराव्याचे फलित उशिरा का होईना अखेर मिळाले, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा हा एक प्रयत्न होता, पण प्रयत्न फसला, याबाबत आता न्यायालयही लढाई आम्ही लढणार असून अल्पवयीन मुलाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.




Post a Comment

0 Comments