बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर प्रशासनाची धडक



बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर प्रशासनाची धडक

◾शिक्षकाच्याच मदतीने सुरू होता प्रकार


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : इयत्ता 10 वीच्या परिक्षेत इंग्रजीच्या पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. हा प्रकार शनिवार (दि. 1) रोजी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला. 

शनिवारी 10 वी चा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपुर्वा बासूर यांनी नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयाला भेट दिली. येथील वर्गखोली क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करीत असतांना शिक्षक दीपक मुरलीधर तुराणकर हे विद्यार्थ्यांजवळ असलेल्या कॉपी गोळा करीत होते. तत्पुर्वी तुराणकर यांनी कॉपी बहाद्दरांवर कोणतीही कारवाई न करता विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची मुकसंमतीच दिल्याचे निदर्शनास आले. तसेच वर्गखाली क्रमांक 7 मध्ये आणि संपूर्ण शाळेत इतर ठिकाणीसुध्दा मोठ्या प्रमाणात कॉपी असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी संबंधित परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षापासून गोपाळराव वानखेडे विद्यालय हे परिक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव माध्यमिक बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच कॉपी करतांना आढळून आलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकरणे रजिस्टर करून बोर्डाकडे वेगळी पाठविण्यात आली आहे. तर कॉपी करण्यासाठी मदत करणारे शिक्षक दीपक तुराणकर यांचा अहवाल बोर्डाकडे पाठविला जाईल. बोर्डाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे यांनी सांगितले.    तसेच जिल्ह्यात कुठेही परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणे निदर्शनास आली तर नागरिकांनी परीक्षा परिरक्षक किंवा शिक्षण विभागाला तात्काळ कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 




Post a Comment

0 Comments