बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील तरुणाने घेतला गळफास
◾काही दिवसापासून सासऱ्याकडे होता वास्तव्याला; आत्महत्याचे कारण अस्पष्ट
बल्लारपूर/ विसापूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : बल्लारपूर तालुक्यातील विसापुरात एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी ( दि.२४ ) रोजी दुपारी १ वाजता घडली. त्याने हातरूमाल गळ्यात अडकवून जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तो मागील काही दिवसापासून सासऱ्याकडे वास्तव्याला होता. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विजय कुंडलिक चुधरी ( 30 ) रा.साईबाबा वार्ड क्रमांक ५ विसापूर असे आहे.
विजय चुधरी याचे गावातील माधुरी नावाच्या मुली सोबत लग्न झाले होते. तो वाहन चालक म्हणून काम करीत होता. मात्र काही दिवसापासून तो कामावर जात नव्हता. त्यामुळे घरी अडचण निर्माण झाली होती. अशातच विजय व त्याची पत्नी माधुरी गावातच असलेल्या सासरी राहत होते. आज दिवसभर पाऊस सुरु असल्यामुळे त्याने पत्नीला चकल्या बनविण्यास सांगितले.
दरम्यान मी विश्रांती घेतो,असे सांगून तो जुन्या घरी गेला. अशातच मोबाईल फोन मागण्यासाठी पत्नी माधुरी विजय कडे गेली. तेव्हा तिला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे पत्नी माधुरीने एकच हंबरडा फोडला. तिच्या नातेवाईकांनी धाव घेऊन गळफास घेतलेल्या विजयला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती विसापूर पोलीस चौकीला देण्यात आली. पोलीस कर्मचारी साखरकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याचे शव शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. विजयने आत्महत्या का केली,याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक असिफराजा बी.शेख यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.







.png)


0 Comments