शेतक-यांनी एकात्मिक पध्दतीने पिक व्यवस्थापन करावे : डॉ. उषा डोंगरवार
गिरगाव येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
चंद्रपूर, दि.14 मार्च : शेतक-यांनी लागवड केलेले पिक धान, इतर पिके त्यांचे एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, तण व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. एकात्मिक पध्दतीने पिक व्यवस्थापन केल्यास शेतीमधील खर्च कमी राखला जाऊन उत्पादन अधिक मिळण्यास व जमिनीचे आरोग्य राखण्यास मदत होईल असे मत सहयोगी संशोधन संचालक कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही डॉ. उषा डोंगरवार यांनी व्यक्त केले.
कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही व चंद्रपूर अॅग्री प्रोसेसर प्रोडुसर कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने समृध्दी महिला सहकारी पतसंस्था सभागृह, गिरगांव येथे दिनांक 13 मार्चला शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजीपंत सोनवाणे, किटकशास्त्रज्ञ तथा सहयोगी प्राध्यापक, कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही डॉ. प्रविण राठोड, अध्यक्ष चंद्रपूर अॅग्री प्रोसेसर प्रोडुसर कंपणी गिरगांव अशोकराव गायकवाड,माजी सरपंच फाल्गुणराव गिरडकर तसेच आदर्श शिक्षक तथा प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमास गिरगांव येथील 50 शेतकरी पुरुष व महिला सहभागी झाले होते.
किटकशास्त्रज्ञ तथा सहयोगी प्राध्यापक, कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही डॉ. प्रविण राठोड यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन, खोडकिडीचे व्यवस्थापन, मित्र व शत्रुकिडी व ट्रायकोकार्डसचा शेतीत वापर याविषयी प्रशिक्षण तसेच शेतात प्रात्यक्षिक करून दाखविले. या प्रशिक्षणामध्ये ट्रायकोकार्डस कृषि महाविद्यालय, नागपूर येथून उपलब्ध करून प्रगतशील शेतकरी माजी सरपंच फाल्गुणजी गिरडकर व बालाजीपंत सोनवाने यांचे शेतात प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी अध्यक्ष, चंद्रपूर अॅग्री प्रोसेसर प्रोडुसर कंपणी गिरगांव अशोकराव गायकवाड यांनी शेतक-यांनी संघटीत होऊन, चर्चेतून समस्या सोडवाव्यात असे आवाहन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजीपंत सोनवाणे यांनी आवश्यकतेनुसार कृषि निवीष्ठांचा वापर करावा. परंपरागत शेती व आधुनिक शेतीची सांगड घालावी, असे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील सोनवाणे यांनी तर आभार प्रदर्शन सरिताताई सोनवाणे यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सुमेध काशीवार, अनिल बह्याल, रक्षीत रामटेके, सुयोग तिवाडे, फाल्गुणजी गिरडकर व चंद्रपूर अॅग्री प्रोसेसर प्रोडुसर कंपणी, गिरगांव चे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.



0 Comments