जिल्हाधिकाऱ्यांनी केली रेल्वेस्थानकाची पाहणी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
चंद्रपूर,दि.20 मार्च : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिनांक 20 मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनेसंदर्भात तसेच रेल्वे स्थानकाची स्वच्छता, जनजागृती विषयक पोस्टर, फलके, मदत कक्षाची पाहणी केली.
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची त्याच ठिकाणी नोंदणी करावी, प्रवाशांना विषाणू बाबत सविस्तर मार्गदर्शन करावे व रेल्वे स्थानकावर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्ती यांना दिल्या.
क्राईस्ट हॉस्पिटलमार्फत ऑटो चालकांना मास्क वाटप :
ऑटो चालकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी क्राईस्ट हॉस्पिटल मार्फत ऑटो चालकांना मोफत कापडी मास्कचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. क्राईस्ट हॉस्पिटलचे व्यवस्थापक फादर जोशी यांनी ऑटो चालकांना मास्क कसा वापरावा व कापडी मास्क निर्जंतुकीकरण कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी ऑटो मध्ये प्रवासी वाहतूक करताना स्वतःची सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन यावेळी केले. क्राईस्ट हॉस्पिटलमार्फत आतापर्यंत जिल्ह्यामधील झोपडपट्टी येथील नागरीक तसेच ऑटो चालक,आजारी व्यक्तींच्या नातेवाईकांना 5 हजार मास्क चे वाटप केले आहे.आणख्रीनही मास्क वाटप करणार आहेत.
मदत कक्षाची केली पाहणी :
रेल्वे स्थानकावर इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रवासी येत आहे.अशा प्रवाशांना जर सर्दी,खोकला असे लक्षणे आढळून आल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन व प्रवाशांची माहिती याविषयीचे मदत कक्ष चंद्रपुर महानगरपालिकेअंतर्गत रेल्वे स्थानकावर स्थापन केले आहे.या मदत कक्षाची देखील पाहणी जिल्हाधिकारी यांनी दिली.
रेल्वे प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे विशेष खबरदारी :
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. प्रवाशांनी 1 मीटर अंतर राखूनच रेल्वे तिकीट घ्यावे.यासाठी 1 मीटरची मार्किंग आखून या मार्किंगमध्येच तिकीट प्रवाशांना देण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी नियमित उद्घोषणा, पोस्टर,फलके यांचा वापर करून जनजागृती होत आहे. तसेच नियमित रेल्वे स्थानकाची स्वच्छता देखील करण्यात येत आहे.
रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसेच,कोराेनाला प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात जनजागृती विषयक पोस्टर, फलके लावण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय 07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226,चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 या प्रमुख क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.


0 Comments