हॅन्डवॉश, सॅनीटायझर या वस्तूंच्या काळाबाजारावर
होणार सक्त कारवाई : नितीन मोहिते
चंद्रपूर, दि. 20 मार्च: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हॅन्डवॉश, सॅनीटायझर या वस्तूंचा सर्व ग्राहक तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केलेली आहे.
त्यामुळे या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने संबंधित व्यापारी हॅन्डवॉश, सॅनीटायझर किंमतीपेक्षा कितीतरी जास्त पटीने व विना बिलाने विक्री करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हॅन्डवॉश, सॅनीटायझर या वस्तूंच्या काळाबाजारावर करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते यांनी दिली.
दिनांक 18 मार्च रोजी मे.गजानन मेडिकल चिमूर येथे तपासणी केली असून त्या ठिकाणी मास्कची उच्च दरात विक्री होत असल्याचे आढळून आले तसेच दिनांक 19 मार्च रोजी मे. ग्लोबल मेडिकल स्टोअर्स, चंद्रपूर, मे.श्री साई मेडिकल,चंद्रपूर तर दिनांक 20 मार्च रोजी जैन वॅक्सीन,चंद्रपूर व किर्ती मेडीकल,चंद्रपूर येथे मास्कची उच्च दरात विक्री होत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्राहक नागरिकांनी हॅन्डवॉश, सॅनीटायझर व मास्क या वस्तू खरेदी करताना खरेदी बिलाची मागणी करूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सदर वस्तुंच्या उत्पादन व विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. या वस्तू विक्रीबाबत ग्राहक,नागरिकांची संबंधित विक्रेत्यांनी फसवणूक करू नये.अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई घेण्यात येईल. असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन नितीन मोहिते यांनी केले आहे. अशा प्रकारचा काळाबाजार दिसून आला तर नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर कळवावे.


0 Comments