चंद्रपूर शहर महानगरपालिकेला मिळाला नवा IAS’आयुक्त - अकुनूरी नरेश यांची नियुक्ती

  



चंद्रपूर शहर महानगरपालिकेला मिळाला नवा IAS’आयुक्त - अकुनूरी नरेश यांची नियुक्ती 

◾खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि विकासाची गती वाढावी, या उद्देशाने लोकसभा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या मागणीला अखेर राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाने 11 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी अकुनूरी नरेश यांची चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री यांना 11 ऑक्टोबर 2025 रोजी पाठवलेल्या पत्रात महानगरपालिकेतील वाढती अव्यवस्था, भ्रष्टाचाराच्या तक्रारी, निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि रस्तेव्यवस्थेतील कुचराई याकडे लक्ष वेधले होते.

या गैरव्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष लक्षात घेता, तातडीने सक्षम IAS अधिकारी नियुक्त करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

शासनाने या लोकहिताच्या मागणीवर त्वरित कारवाई करत विद्यमान प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या जागी अकुनूरी नरेश यांची नियुक्ती केली आहे. नरेश यापूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण तसेच सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक येथे यशस्वीपणे कार्यरत होते.

IAS अकुनूरी नरेश — संघर्षातून घडलेले यशस्वी व्यक्तिमत्त्व -

तेलंगणा राज्यातील जयशंकर ( भूपाला पेल्ली ) जिल्ह्यातील कासिमपल्ली गावातून आलेले अकुनूरी नरेश साधारण कुटुंबातील असून, त्यांच्या वडिलांनी सिंगरेनी कंपनीत स्वीपर म्हणून काम केले. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी IIT मद्रास येथून B.Tech–M.Tech ( Dual Degree ) पूर्ण केले. स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी UPSC 2019 परीक्षेत AIR 782 मिळवत भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांचा संघर्षमय प्रवास देशभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मानला जातो.

नियुक्तीमुळे शहराला मिळणार विकासाची गती -

अकुनूरी नरेश यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळेल आणि विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर शहराच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी असलेला अधिकारी आवश्यक होता आणि आता शहराला ते नेतृत्व मिळाले आहे, असे त्या म्हणाल्या.

नव्या IAS आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगरपालिकेत सकारात्मक बदल घडून नागरिकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षा पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.




Post a Comment

0 Comments