महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालविणा-यांविरुध्द कारवाई करावी - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी
◾जिल्हाधिकाऱ्यांकडून रस्ता सुरक्षा समितीचा आढावा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : रस्त्यांवरील अपघात कमी व्हावे, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.15) आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अक्षय पाझारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित हेाते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालविणा-यांविरुध्द कारवाई करावी. रस्त्यावरील गतिरोधक (स्पीड ब्रेकर) मानद नामांकनाप्रमाणेच लावावे, विना परवानगी कुठेही स्पीड ब्रेकर लावू नये. रस्त्याच्या बाजुला मुरुम किंवा माती टाकून साईड शोल्डर तयार करावेत. जेणेकरून वाहन खाली उतरुन अपघात होणार नाही. ज्या ठिकाणी अपघातांची संख्या जास्त आहेत, तेथे असे साईड शोल्डर तातडीने तयार करावे. वाहतुकीच्या नियमांबाबत शाळा – महाविद्यालयांमध्ये पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतुक विभागाने संयुक्त जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावे. अपघात प्रवण स्थळावर (ब्लॅक स्पॉट) तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केल्या.
अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे यांनी सादरीकरण केले. यात वाहतूक सिग्नल, अपघातांची संख्या, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील खड्डे, विविध ठिकाणी संयुक्त भेटी आदींचा आढावा घेण्यात आला.
0 Comments