'जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित' : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार
◾भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ बल्लारपुरात सात किमी तिरंगा यात्रेत उसळला देशभक्तीचा जनसागर
◾'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' जयघोषाने दुमदुमले बल्लारपूर शहर
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावून भूदल, नौदल आणि वायुसेनेतील जवान सेवा करतात. देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्ट प्रवृत्तींना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी आपले जवान सदैव सज्ज असतात. या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
'मिशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ बल्लारपूर शहरात सात किलोमिटर लांब तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी आ.श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
बल्लारपूर येथील काटा गेट डब्लूसीएल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. तिरंगा यात्रेदरम्यान बल्लारपूर शहर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' च्या जयघोषाने दुमदुमले. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,सर्वधर्मीय समाज बांधव आणि आबालवृद्ध नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बल्लारपूरच्या रस्त्यांवर आज राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा जनसागर उसळला. काटा गेटपासून सुरू झालेल्या भव्य तिरंगा रॅलीत सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्वधर्मीय बांधव आणि मोठ्या संख्येने आबालवृद्ध नागरिक ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. काटा गेट डब्लू.सी.एल येथून सुरुवात झालेली तिरंगा यात्रा महात्मा गांधी चौक-गोल पुलिया- डॉ आंबेडकर चौक मार्गे नवीन मुख्य बसस्थानक येथे पोहोचली व येथे यात्रेचे समापन झाले.
प्रारंभी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. हातात राष्ट्रध्वज, घोषणांनी आसमंत दुमदुमवणारे तरुण, महिलांची सक्रिय उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'जय जवान' अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी देशभक्तीचे दर्शन घडवले. लहानग्यांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या यात्रेत सहभाग घेतला.
ही फक्त यात्रा नव्हे, तर आपल्या शुरवीर भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता आहे . देशासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या प्रत्येक सैनिकांच्या पाठिशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे, याची प्रचिती तिरंगा यात्रा देते, असेही यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
माजी सैनिकांचा सत्कार
श्री.पांडुरंग हेमके, वीर पत्नी संगीताताई इंगळे, श्री सहदेव रामटेके, माजी सैनिक विजय शेंडे, मनोज ठेंगणे, हवालदार वीर बहादुर सिंग, जगदीश सिंग,मनोज यादव, श्री विश्वेश्वर सरोज, जन बहादुर सिंग सरोज आदी माजी सैनिकांचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्वधर्मीय गुरूंचा सत्कार
भंतेजी भागीरथ, अल्ताफ भाई, मनीषजी महाराज, सादिक जवेरी, सुनील पास्टर, दलजीत सिंह कलसी आदी सर्व धर्मीय गुरुंचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
0 Comments