चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासंदर्भात सुरक्षिततेच्या सूचना

 





चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासंदर्भात सुरक्षिततेच्या सूचना

◾दक्ष राहण्याचे वन विभागाचे आवाहन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, मध्य चांदा, चंद्रपूर व ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर वनविभागाचा समावेश असून सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. या कार्यातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो.

जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

तथापि, तेंदूपत्ता हंगाम - 2025 दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये 7 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना खालील सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

1. वाघाच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.

2. संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.

3. सकाळी 8  वाजता पूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी 5 वाजता पूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.

4. एकट्याने जंगलात जाऊ नये. समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे.

5. प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.

6. संकलन दरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात घालावा.

7. वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी.

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments