आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरात होणार ‘ग्लोबल पॅगोडा’च्या धर्तीवर विपश्यना केंद्राची उभारणी
◾मुंबई येथील जगप्रसिद्ध पॅगोडा ची प्रतिकृती चंद्रपूरात उभारण्याचे प्रयत्न सुरू; मनपा अधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूरमध्ये शांतता, साधना आणि मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विपश्यना केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून मुंबई येथील जगप्रसिद्ध ग्लोबल पॅगोडा च्या धर्तीवर चंद्रपूरात विपश्यना केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ग्लोबल पॅगोडा ची प्रत्यक्ष पाहणी केली.
या शिष्टमंडळात महाथेरो डॉ. सुमनवन्नो, चंद्रपूर महानगरपालिकेचे शहर अभियंता रवींद्र हजारे, कनिष्ठ अभियंता नरेंद्र पवार, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, श्याम हेडाऊ, धम्मभूमी महाविहाराचे उपाध्यक्ष राजेश थूल, कोषाध्यक्ष संतोष रामटेके आदींचा समावेश होता. यावेळी ग्लोबल पॅगोडा पॅलेसच्या जनसंपर्क अधिकारी शक्ती कपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या पाहणी दरम्यान वास्तुशिल्प, स्थानिक सुविधांचा वापर, साधकांसाठी आवश्यक रचना, पर्यावरणपूरक बांधणी आदी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. संबंधित तांत्रिक पथकाने संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ चित्रीकरण गोळा करून त्याचे सादरीकरण आमदार किशोर जोरगेवार यांना केले.
या अभ्यास दौऱ्यानंतर आमदार जोरगेवार यांनी सांगितले, चंद्रपूरात पॅगोडाच्या धर्तीवर विपश्यना केंद्र उभारण्याच्या दिशेने लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील. हे केंद्र केवळ ध्यानधारणा केंद्र न राहता, चंद्रपूरच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करेल.विपश्यना साधना ही बौद्ध परंपरेतील शुद्ध अंतर्मुखी साधना असून, जगभरात लाखो लोक मानसिक शांती व स्थैर्यासाठी या मार्गाचा अवलंब करत आहेत. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न जिल्ह्यात हे केंद्र उभारल्यास ते विदर्भ व मध्य भारतासाठी एक प्रेरणास्थान ठरेल. या उपक्रमामुळे आध्यात्मिक पर्यटनालाही चालना मिळेल व नागरिकांच्या मानसिक आरोग्यवृद्धीसाठीही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरात भव्य विपश्यना केंद्र उभारण्याचा संकल्प आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला होता. आता त्यांनी त्या दिशेने प्रत्यक्षात कृती सुरू केली आहे. बाबूपेठ येथील धम्मभूमी महाविहाराच्या सात एकर जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आराखडा, निधी उभारणी, शासनमान्यता प्रक्रिया आदींची कार्यवाही लवकरच सुरू होणार असून, या पहाणी दौऱ्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना परवानग्या व अन्य प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
0 Comments