बल्लारपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

 








बल्लारपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

◾काँग्रेसने केली निवेदनातून आग्रही मागणी : तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर तालुक्यात आठवड्यापासून संततधार पाऊस होत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गांवर आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने बल्लारपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारमार्फत सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर तालुक्यातील शेती हंगाम अवलंबून आहे. मात्र अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.नदी व नाल्याचे पाणी शेतात साचल्यामुळे शेत पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बल्लारपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

शहर व ग्रामीण भागात शासनाची घरकुल योजना चालू आहे. मात्र घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नाही.यामुळे अनेकांचे घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.परिणामी हक्काच्या निवाऱ्यापासुन अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. बांधकाम करणाऱ्या मजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. घरकुल लाभार्थ्यांना सुलभ रेती उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

बल्लारपूरचे तहसीलदार ओंकार ठाकरे यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बल्लारपूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,अध्यक्ष गोविंदा उपरे,सुरेश वासाडे,काँग्रेसचे न.प.चे माजी गट नेते देवेंद्र आर्य,भास्कर माकोडे,कार्तिक जिवतोडे,प्राणेश अमराज,अरुण पेंदोर,राकेश भोयर,रेवनाथ ठाकरे,सुरेश बोप्पनवार आदींचा समावेश होता.




Post a Comment

0 Comments