पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात सिध्दबली पूर्व कामगार व प्रकल्पग्रस्तांचे कंपनी प्रवेशव्दारासमोर निदर्शने
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी सिध्दबली इस्पात कंपनी तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने, चर्चा, बैठका घेवुनही कंपनी व्यवस्थापन मनमानी धोरण स्विकारत असल्याच्या निषेधार्थ दि. 20 सप्टेंबर रोजी अन्यायग्रस्त पूर्वीच्या कामगारांनी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात सिध्दबली कंपनीच्या प्रवेश व्दारासमोर निदर्शने करुन संताप व्यक्त केला.
सिध्दबलीच्या या पूर्व कामगारांच्या न्यायोचित मागण्यांची कंपनी व्यवस्थापनाने पूर्तता करावी यासाठी हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात हे कामगार शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. परंतु कामगारांचा हक्क डावलून कंपनीचे व्यवस्थापन पळपुटी भुमिका स्विकारत असल्यामुळे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीस पाचारण केल्यानंतरही बैठकीपासून पलायन करण्याची भुमिका सिध्दबली व्यवस्थापनाने स्विकारल्यामुळे संतप्त झालेल्या या पूर्व कामगारांनी निदर्शने करुन व्यवस्थापनाच्या भुमिकेचा निषेध केला.
सिध्दबली व्यवस्थापनाने पूर्व कामगारांचे थकीत वेतन अंतिम देयके त्वरीत देऊन पुर्ववत कामावर सामावून घ्यावे. 21 फेब्रुवारी 2021 रोजी कंपनीत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या घातपाती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. जिवीतहानी झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य व रोजगार देण्यात यावा. राज्य शासनाच्या धोरणानुसार स्थानिकांना 80 टक्के नौकऱ्यात प्रशिक्षण देवुन सामावून घ्यावे. कोर्टाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा. प्रकल्पग्रस्त कुटूंबातील एका व्यक्तीस शासन धोरणानुसार नौकरीत घेण्यात यावे, आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त कामगारांनी निदर्शने केली.
या निदर्शने कार्यक्रमात भाजपाचे तालुका महामंत्री विजय आगरे, विनोद खेवले, कामगार नेते उत्तम आमडे यांचेसह नारायण उप्पलवार, सत्यपाल खेवले, भारत पाचभाई, वसंता अंड्रस्कर, देविदास घिवे वारलु वरपाडे, रमेश सोनटक्के, दिलीप शास्त्रकार, मुन्ना कुशवाह, सुशिल चिवंडे, विलास तोरणकर, मंदा पाल, आमटे ताई, सरला चिवंडे, श्रीमती झिंगरे व अन्य प्रकल्पग्रस्त व पूर्व कामगार सहभागी झाले होते यावेळी निदर्शकांनी सिध्दबली व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरणाचा घोषणा देवुन निषेध नोंदविला.









0 Comments