सिध्दबली पूर्व कामगारांच्या न्याय मागण्या आठवडाभरात सोडवा अन्यथा कंपनी व सहा. कामगार आयुक्तांविरोधात तीव्र आंदोलन छेडू - हंसराज अहीर

 






सिध्दबली पूर्व कामगारांच्या न्याय मागण्या आठवडाभरात सोडवा अन्यथा कंपनी व सहा. कामगार आयुक्तांविरोधात तीव्र आंदोलन छेडू - हंसराज अहीर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सिध्दबली इस्पात कंपनी अन्यायग्रस्त 87 पूर्व कामगारांच्या मागण्यांबाबत गंभीरपणे कार्यवाही करीत नसेल तर या सर्व कामगारांसह कंपनी तसेच सहा. 

कामगार आयुक्त यांचे विरोधात लवकरच तीव्र आंदोलन छेडू असा खणखणीत इशारा पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिला आहे. सिध्दबली इस्पात कंपनीच्या पूर्व कामगारांनी गत वर्षभरापासून निवेदने, चर्चा, बैठका आदिंच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यांची पूर्तता करुन घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करुन कामगारांच्या न्यायोचित मागण्यांची सिध्दबली व्यवस्थापनाने पूर्तता करावी असे निर्देश देवूनही कंपनी व्यवस्थापन अडेलतट्टु धोरण स्वीकारत आहे. या अन्यायग्रस्त कामगारांची बोनस, अंतिम थकबाकी, ग्रॅज्युईटी, अन्य देय राशी व रोजगार देण्याची रास्त मागणी असतांना जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाला कंपनी जुमानत नसेल तर या कामगारांनी न्यायाची अपेक्षा कशी करायची? असा सवाल करीत अहीर त्यांनी सहा. कामगार आयुक्त कामगारांचे म्हणणे गंभीरतेने घेत नसून कंपनीला मदत करीत असल्याचा आरोप केला आहे.

राज्य शासनाच्या कामगार धोरणाचा फज्जा उडवत कंपनीने परप्रांतीयांना कंपनीमध्ये सामावून घेण्याचा धडाका चालविला आहे. स्थानिक कामगारांना नौकऱ्या नाकारुन परप्रांतीयांचे कंपनी लाड पुरवीत असेल तर सहन केले जाणार नाही. सिध्दबली व्यवस्थापनाने या पुर्व कामगारांच्या सहनशिलतेचा आणखी अंत बघु नये अन्यथा त्यांना जाब द्यावा लागेल असेही अहीर यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी, सहा. कामगार आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त बैठकीत कंपनी व्यवस्थापन आश्वासनाखेरीज काहीही ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करित असल्याने व याला सहा. कामगार आयुक्तांचे अभय असल्यानेच सिध्दबलीचे पूर्व कामगार अजूनही न्याय हक्कापासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन हाच पर्याय असल्याचे कंपनीच्या एकुणच धोरणावरून दिसते. त्यामुळे येत्या आठवडाभरात या पूर्व कामगारांचा प्रलंबित प्रश्न कंपनीने मार्गी न लावल्यास सहा. कामगार आयुक्त व उद्योग प्रबंधनाविरूध्द तीव्र आंदोलन छेडले जाईल व याची संपूर्ण जबाबदारी संबंधितावर राहील असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.



Post a Comment

0 Comments