जाणून घ्या ! २०२२ मधील महत्वाच्या घडामोडी व स्पर्धा
वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : २०२१ साल संपून २०२२ सुरू झाले असले तरी करोनाचा धोका संपुष्टात येण्याऐवजी तो वाढताना दिसत आहे. त्यामुळे चालू वर्षात करोनामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना माणसाला करावाच लागणार आहे. असे असले तरी चालू वर्षात देशसमोर अनेक संधी, नवी क्षेत्रे आणि सकारात्मक उद्दीष्टे वाढून ठेवली आहेत. या सगळ्या गोष्टींना देशवासी कसे सामोरे जातात यावरूनच हे वर्ष कसे जाणार हे ठरणार आहे. त्यासाठी २०२२ या वर्षातील आगामी मोठ्या घटनांवर लक्ष असणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
१) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव -
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला यंदा ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारने अनेक कार्यक्रमांची घोषणा केलेली आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि कार्य जगासमोर सादर करण्याच्या दिशेने सरकारतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. १२ मार्च २०२१ पासून त्याची सुरवात झालेली असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
२) राष्ट्रपतीपदाची निवडणूक
यावर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून देशाच्या १७ व्या राष्ट्रपतींची निवड केली जाईल. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद जुलै २०२२ पर्यंत या पदावर असणार आहेत. घटनेच्या कलम ५६(१) नुसार राष्ट्रपतीपदाची मुदत पाच वर्षांची असते. त्यानंतर त्या पदासाठी निवडणूक घेण्यात येते. राष्ट्रपतींची निवड थेट जनतेतून मतदानाद्वारे न होता इलेक्टोरल कॉलेजद्वारे मतदानाने होते. त्यासाठी सर्व खासदार आणि राज्यांमधील विधानसभेचे सदस्य मतदान करतात.
३) सात राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका -
देशात चालू वर्षात एकूण सात राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात ही राज्ये महत्त्वाची आहेत. त्याखेरीज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपला समाजवादी पक्षाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात गोवा, हिमाचल प्रदेश आणि मणिपूर या सहा राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. या निवडणुकानंतर राज्यसभेतील समीकरणांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
४) अंतराळ संशोधनात मोठ्या कामगिरीची अपेक्षा -
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२२ या वर्षात दोन मानवरहित अंतराळ योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी गगनयान मोहिन जाहीर केली जाणार आहे. ज्यामध्ये भारतातून पहिल्यांदा अंतराळात माणूस पाठवला जाईल. ही मोहिम २०२१ मध्येच पार पाडली जाणार होती मात्र, करोनाच्या परिस्थितीमुळे या मोहिमेला उशीर झाला. त्याआधी मानवरहित योजना लॉन्च करण्यात येतील. त्यामध्ये अंतराळात यंत्रमानव पाठवण्यात येतील. या यंत्रमानवांना वायुमित्र असे नाव देण्यात आले आहे. याखेरीज २०२२-२३ या वर्षात चांद्रयान-३ मोहिम राबवण्याचे उद्दीष्टही इस्रोने ठेवले आहे.
5) जी-२० देशांचे नेतृत्त्व -
आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे वर्ष भारतासाठी महत्त्वाचे आहे. यंदा जी-२० देशांच्या गटाचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे. करोनाच्या साथीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचा दृष्टीकोन सादर करण्याची ही संधी असणार आहे. जी-२० देशातील बहुतेक सर्व नेत्यांशी मोदींचे चांगले संबंध आहेत. या देशांच्या बैठकीच्या निमित्ताने काही देशांच्या नेत्यांशी वैयक्तिक गाठीभेटी आणि त्यातही प्रामुख्याने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मोदींची भेट झाली तर सीमेवरील वाद निवळण्यासाठी मदत होईल.
६) हिवाळी ऑलिंपिक, विशेष खेळाडूंचे ऑलिंपक, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा - चालू वर्षात तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची आणि पदकांची लयलूट करण्याची संधी भारतीय खेळाडूंसमोर असणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये १० ते २५ दरम्यान आशियाई स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. चीनमधील हांग्झू शहराला यावेळच्या आशियाई स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे.
७) फाईव्ह-जी - चालू वर्षांच्या मध्यापर्यंत देशातील निवडक शहरांमध्ये फाईव्ह-जी तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेट सेवा पुरवण्यास प्रारंभ होईल. त्यामुळे इंटरनेट सेवेचा वेग आश्चर्यजनक वाढून डिजिटल देवाण-घेवाण आणखी सुलभ होईल. ही सेवा मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळूर, चंडीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरूग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकता, लखनौ या शहरांमध्ये सुरू होणार आहे. देशात पहिल्यांदा फाईव्ह-जी सेवा कुठली कंपनी सुरू करणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीन कंपन्या यासंदर्भातील चाचण्यांवर काम करत आहेत.
८) पंतप्रधानांचे विदेश दौरे - भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर यंदा बरीच मोठी कामगिरी करण्याची आणि भूमिका वठवण्याची संधी आहे. मोदी या वर्षाच्या सुरवातील जर्मनीचा दौरा करणार आहेत. त्याठिकाणी ते सहाव्या इंडो-जर्मन आंतरदेशीय चर्चासत्रात भाग घेतील. जर्मनीचे नवे चॅन्सेलर ओलाफ शुल्ज यांच्याशी चर्चा करतील. फेब्रुवारीमध्ये क्वाडच्या दुसऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. यावेळी ही बैठक जपानमध्ये होणार आहे. अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख एकत्र येतील. प्रशांत महासागरात तसेच हिंदी महासागरातील चीनच्या उठाठेवींविषयी यावेळी चर्चा होईल. त्याखेरीज यंदाच्या वर्षी कंबोडियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आसियान देशांच्या परिषदेतही मोदी सहभागी होणार आहेत.
९) कतारमधील फिफा फुटबॉल विश्वकरंडक - फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेची विश्वकरंडक स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान कतारमध्ये होणार आहे. गतविजेता फ्रान्स करंडक कायम राखण्यासाठी जिद्दीने लढेल तर लिओनेल मेस्सीसारख्या खेळाडूंसाठी ही शेवटची विश्वकरंडक स्पर्धा ठरणार असल्याने त्यांच्याकडूनही चुरशीचा खेळ केला जाईल. फुटबॉलच्या चाहत्यांसाठी ही मोठी मेजवानी असणार आहे.


0 Comments