हेलिकॉप्टर अपघातात तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू


हेलिकॉप्टर अपघातात तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू 

◾कोण आहेत बिपिन रावत?

नवी दिल्ली ( राज्य रिपोर्टर ) :  देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी व इतर ११ जनांचाही मृत्यू झाल्याची वाईट घटना घडली आहे.

सविस्तर आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचे एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले असून या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे.

कोण आहेत बिपिन रावत ?

बिपिन रावत यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि देशातील पहिले CDS अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सीडीएस अधिकारी बनलेली बिपिन रावत हे पहिली व्यक्ती आहे. CDS म्हणजेच संरक्षण कर्मचारी हे अधिकारी आहेत जे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतात आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार आहेत. दरम्यान, जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments