बल्लारशाह - गोंदिया पेसेंजर तिकीट दरांमध्ये भरमसाट ( दुप्पट ) वाढ



बल्लारशाह - गोंदिया पेसेंजर  तिकीट दरांमध्ये भरमसाट  ( दुप्पट ) वाढ 

◾बल्लारशाह - गोंदिया पेसेंजर बल्लारपूर साठी ठरली औट घटकेची सद्यस्थितीत चांदा फोर्ट पर्यंतच धावणार ही रेल्वे 

◾बल्लारपूरला डच्चू देण्यात आला !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : प्रवाशांचा सातत्याचा रेटा, लोकप्रतिनिधींचे शर्थीचे प्रयत्न आणि रेल्वे प्रवासी मंडळ तसेच, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य या सर्वांच्या आग्रहाखातर सामान्य प्रवाशांच्या सोयीची असलेली आणि आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना परवडणारी बल्लारशाह ( बल्लारपूर ) - गोंदिया ही पॅसेंजर गाडी दीड वर्षानंतर मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, या गाडीचा फेरा दिवसातून एकच ( अप व डाऊन ) एवढाच सीमित ठेवण्यात आला आहे. तद्वतच तिकीट दरांमध्ये भरमसाट  ( दुप्पट ) वाढ केली आहे. या कारणांनी प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराज झाले. यात भरीस भर की काय या रेल्वेगाडीचा बल्लारशाहपर्यंतचा फेरा बुधवारपासून बंद करण्यात आलेला आहे. ही गाडी आता गोंदियापासून चांदा फोर्टपर्यंत येऊन तिथूनच गोंदियाला परत जात आहे. अशाप्रकारे बल्लारपूरला डच्चू देण्यात आला आहे. बल्लारपूरची ही घोर उपेक्षा आहे.

या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी. या मार्गावरील प्रवाशांची संख्या बघता, पूर्वीसारख्याच एकाहून अधिक फेऱ्या होणे गरजेचे आणि प्रवाशांच्या सोयीचे आहे. मंगळवारी ८ डब्यांची ही गाडी बल्लारशाह स्थानकावर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी फलाट क्रमांक एकवर येऊन पोहोचली. २ वाजून १५ मिनिटांच्या परतीच्या प्रवासात येथून ३१ प्रवासी बसलेत. ही गाडी पॅसेंजर म्हणूनच ओळखली जात असली तरी नव्याने तिला रेल्वेच्या भाषेत मेल एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. म्हणूनच असावे, तिकिटाचा दर पूर्वीपेक्षा दुप्पट ( पूर्वी ५० रुपये आता ९० रुपये ) करण्यात आला आहे. जो सामान्य प्रवाशांना धक्का देणारा आहे.

चांदा फोर्टला प्राधान्य - ही पॅसेंजर नव्याने सुरू झाल्यानंतर फक्त मंगळवारलाच बल्लारशाहपर्यंत आली. बुधवारपासून फक्त चांदापर्यंत येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून तसा आदेश बल्लारशाह स्थानकाकडे आला आहे. ही गाडी पूर्वीप्रमाणेच बल्लारशाहपर्यंत येणे आवश्यक आहे.






Post a Comment

0 Comments