कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आली


कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आली 

विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही.

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबेला उज्जैनमधून अटक

लखनौ (राज्य रिपोर्टर) : कानपूरमध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधून विकास दुबेला बेड्या ठोकण्यात आल्या. 
गँगस्टर विकास दुबेला अत्यंत नाट्यमय पद्धतीने अटक झाली. आधी त्याने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दोन सहकाऱ्यांसोबत देवाचे दर्शन घेतले. विकास दुबे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला ओळखले. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. जवळपास १० राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.
विकासच्या दोन साथीदारांचा खात्मा

आज सकाळीच पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. दोघेही कानपूर हत्याकांडात सहभागी देखील होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.
पाच लाखांचा इनाम 

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे अखेर  मध्य प्रदेशात पकडलं. मात्र तीन जुलैपासून तो फरार होता. त्याची माहिती देणाऱ्याला पहिल्यांदा पोलिसांनी ५० हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नंतर ही रक्कम २.५ लाख केली होती तर काल, बुधवारी त्याची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचा इनाम देण्यात य़ेईल, असं सांगितलं होतं.
३ जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चित्रपटाच्या कथानकासारखी घटना घडली होती.  विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.
विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने २००१ मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती.

Post a Comment

0 Comments