विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या मुंबईस्थित राजगृह निवासस्थानावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा : खा. बाळू धानोरकर
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या मुंबईस्थित राजगृह निवासस्थानाला पोलीस बंदोबस्तात सुरक्षा कवच दिल्याबद्दल राज्य सरकारचे जाहीर आभार
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईस्थित निवासस्थानावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहे. या पार्श्वभुमिवर चंद्रपूर- वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत राजगृह निवासस्थानावर कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे सुरक्षा कवच दिल्या बद्दल राज्य सरकारचे जाहीर आभार खासदार धानोरकर यांनी मानले आहे. मुख्यमंत्र्यांनां लिहिलेलं पत्र जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना दिलं आहे.
पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुजान असून या हल्ल्यानंतर शांतता राखत समाजकंटकांचे डाव हाणून पाडले. याबद्दल जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना काळात आपल्याला अधिक सजग राहणे गरजेचे झाले आहे असेही धानोरकर म्हणाले. तर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान म्हणजे केवळ चार भिंती नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आवाजाचा ऐतिहासिक ठेवा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारी ही ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत आपला इतिहास, सध्याचे वर्तमान व देशाचे भविष्य ठरविणारी आहे. यापुढील काळात कोणत्याही प्रकारचे अनुचित कृत्य घडू नये म्हणून मुंबईस्थित राजगृह निवासस्थानावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी निवेदनाद्वारे खा. धानोरकर यांनी केली. सामाजिक दरी निर्माण करणारे हल्ले या महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी आम्ही तुमच्या नेतृत्वात या प्रयत्नांना थारा लागू देणार नाही असे प्रतिपादन धानोरकर यांनी केले.
दरम्यान सामजिक दरी निर्माण करण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी हा डाव रचला असल्याने याबाबत तातडीने पाऊले उचलण्याची मागणी खा. धानोरकर यांनी मुख्मंत्र्यांकडे केली आहे.



0 Comments