कोरोना व साथ रोगाच्या काळात
आरोग्य कर्मचारी मुख्यालयीच हवा
पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांचे निर्देश
Ø कोरोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक
Ø जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत करा
Ø उपकेंद्र, प्राथमिक केंद्रात निवासाची व्यवस्था उत्तम करा
Ø पावसाळ्यात साथ रोगाचा उद्रेक होणार नाही याकडे लक्ष द्या
Ø साप चावल्याच्या संदर्भात आवश्यक लसीची उपलब्धता ठेवा
Ø सर्व शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे
Ø प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल स्कूल उभारण्यात यावे
Ø मनरेगाच्या कामाची मुबलक उपलब्धता असली पाहिजे
Ø शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी अधिक काळजीपूर्वक नियोजन करा
चंद्रपूर, दि.2 जून (राज्य रिपोर्टर): कोरोना आजाराने ग्रामीण भागासह शहरी भागात थैमान घातले आहे. अशातच पावसाळ्याच्या तोंडावर साथरोग मोठ्या प्रमाणात उफाळून येतात. अशावेळी प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयी राहून जनतेची सेवा करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
कोरोना विषाणू संसर्ग आणि मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांची बैठक आज नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेने कोरोना विषाणू संसर्गाचा संदर्भात केलेल्या उपाययोजना आणि मान्सून पूर्वतयारीचा आढावा सादर केला.
500 सरपंचाची ऑनलाइन केलेला संवाद, जवळपास 25 हजार लोकांशी टेलीफोन लाईनवर साधलेला संपर्क, आत्मभान अभियानाच्या मार्फत सुरू असणारी जनजागृती, आरोग्य कर्मचाऱ्यांनी 70 हजार बाहेरून आलेल्या नागरिकांची केलेली नोंद, आशा वर्कर व शिक्षकांनी कोरोना लढाईमध्ये निभावलेली जबाबदारीची भूमिका, मेगा फोनद्वारे जनजागृतीचा अभिनव प्रयोग, जिल्हास्तरावर आयुष उपक्रमात राबवण्यात आलेली मोहीम याबाबतची माहिती राहुल कर्डिले यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लढाईमध्ये केलेल्या कामाचे यावेळी कौतुक केले. मात्र येणाऱ्या पावसाळ्यात साथ रोगाच्या प्रादुर्भाव आणि कोरोना आजार कायम असतांना ग्रामीण भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे,असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत यांनी या संदर्भात विशेष निर्देश जारी करावे असेही त्यांनी सुचविले.
यासोबतच आरोग्य विभागाचा आढावा घेताना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व अन्य आरोग्य यंत्रणा बळकट ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना आजाराच्या भविष्याबाबत अद्यापही काहीही सांगता येत नाही. ग्रामीण भागांमध्ये अशावेळी शासकीय आरोग्य यंत्रणा एकमेव आधार ठरणार आहे. यासाठी औषधांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची उपलब्धता, साप चावल्यानंतर औषधोपचाराची उपलब्धता, याबाबत लक्ष वेधण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामाचाही आढावा घेतला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात या कामातून रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सूचना त्यांनी केली. पुढील काळात साथरोग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने अतिशय लक्षपूर्वक पावसाळ्यापूर्वीच या कामाला सुरुवात करावी, सर्व गळती दूर करावी, शुद्ध पाणीपुरवठा होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण रोजगार यंत्रणेमार्फत उपक्रमांची देखील त्यांनी यावेळी माहिती घेतली. घरकुल योजनेअंतर्गत राहिलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागामार्फत यावर्षी शाळेचे भविष्य काय असेल याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्य स्तरावरील हा निर्णय असून जेव्हा शाळा सुरू होईल, त्यावेळेस संपूर्ण शाळांचे निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. त्यासाठी नियोजन करा. शाळा सुरुवात करण्यापूर्वी सर्व शाळांमधील कॉरेन्टाईन केंद्र बंद असतील.त्याचे पूर्णतः निर्जंतुकीकरण झाले असेल. याची शाश्वती स्वतः अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर व दिपेन्द्र लोखंडे यांना सूचना करताना प्रत्येक तालुक्यामध्ये एक मॉडेल स्कूल निर्माण करण्याची त्यांनी सांगितले. यासंदर्भातील योग्य तो प्रस्ताव सादर करावा व प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय उत्तम अशी एक शाळा मॉडेल स्कुल म्हणून पुढे आणावी ,अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यामध्ये जवळपास पावणे चार लाख विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या सर्वांना अतिशय उत्तम पद्धतीचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून काही प्रयोग करण्याची देखील त्यांनी यावेळी सूचना केली.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, लेखाधिकारी तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) पवार, कार्यकारी अभियंता (सिंचाई) पिदुरकर ,कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) पिपरे , समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण,सामान्य प्रशासन विभाग) संजय जोल्हे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सोमनाथे, जिल्हा कृषी अधिकारी दोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पचारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) धनवडे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले.



0 Comments