ओ.बी.सी युवक-युवतींनी स्वयंरोजगारासाठी महामंडळाच्या
योजनेचा लाभ घ्यावा : विजय वडेट्टीवार
चंद्रपूर दि. 17 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील ओ.बी.सी युवक-युवतींनी स्वयंरोजगारासाठी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे बहुजन कल्याण विभाग,खार जमिन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ या कार्यालयांतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींकरिता विविध योजना राबविल्या जातात. या योजनेमध्ये लघुउद्योग व स्वयंरोजगार याकरिता अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय, वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बावनकर यांनी महामंडळाच्या योजनेविषयी माहिती दिली असता प्रामुख्याने जिल्ह्यातील युवक-युवतींकरिता लघुउद्योग व स्वयंरोजगार यासाठी अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा संदर्भात विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक-युवतींकरीता रु 1 लक्षची थेट योजनेअंर्तगत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उद्योगासाठी 1 लाखाची विना व्याज थेट योजना सुरु केली आहे. सदर योजनेत नियमीत परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना द.सा.द. शे. 4% व्याज आकारण्यात येईल व कर्ज परतफेडीची मुदत 4 वर्ष आहे.
5 लक्ष रुपये पर्यतची 20 टक्के बिज भांडवल योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु.5 लाख पर्यंतचे प्रकल्पास मंजूरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजूरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5% लाभार्थी, 20% महामंडळ व 75% बॅकेचा सहभागआहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर 6% व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रकमेवर बॅकेचा व्याज दर लागू राहील. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे. बीज भांडवल योजनेंतर्गत महामंडळाकडे पर्याप्त निधी उपलब्ध आहे.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत बँकेने रु. 10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बॅक निकषांनुसार आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेअंर्तगत महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनीयम 2013 अंतर्गत), एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बॅक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल. इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcftc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहीतीसाठी महाराष्ट्र राज्य, इतर मागासवर्गीय, वित्त आणि विकास महामंडळ (मर्या) जिल्हा चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.



0 Comments