नागरिकांनी घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती देऊन सहकार्य करावे : संपत खलाटे
केंद्र शासनाच्या सातव्या आर्थिक गणनेला सुरुवात
चंद्रपूर, दि.13 मार्च: केंद्र शासनाद्वारे देशामध्ये आर्थिक गणनेला सुरूवात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सुद्धा सातवी आर्थिक गणनेची सुरुवात 26 नोव्हेंबर 2019 करण्यात आली आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती देवून सहकार्य करावे,असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांनी केले.जिल्ह्यातील उद्याेग व्यवसाय व सेवांची गणना करण्यासाठी ही गणना होणार आहे.
कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) या यंत्रणेमार्फत आर्थिक गणनेचे काम करण्यात येत आहे. यासाठी प्रगणकांची नेमणूक करण्यात आली असून हे प्रगणक आपले ओळखपत्र दाखवून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन माहिती संकलित करतील.
कृषी, खाणकाम, वस्तु निर्माण, पाणीपुरवठा, बांधकाम, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, वाहतूक, साठवणूक, हॉटेल माहिती व दळणवळण संदर्भातील सेवा, वित्तीय व विमा सेवा, स्थावर मालमत्तेसंबंधीचे कार्य, व्यावसायिक कार्य, वैज्ञानिक व तांत्रिक कार्य, प्रशासकीय व आधार सेवा कार्य, शैक्षणिक मानवी आरोग्य व सामाजिक कार्य, कला, करम़णूक, क्रीडा, मनोरंजन व अन्य कार्यात सहभागी असणाऱ्या आस्थापनांची व नियमित काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती यामार्फत घेण्यात येणार आहे. देशामध्ये जनगणना, पशुगणना ज्या पद्धतीने केली जाते तशीच ही आर्थिक गणना केली जाते.
प्रगणकांनी गोळा केलेली आर्थिक गणनेविषयक माहिती केंद्रशासनाकडे सादर केल्यानंतर त्याआधारावर विकास योजना तयार केल्या जातात व देशाच्या आर्थिक आघाडीवर वेगवेगळे धोरण व योजना ठरवीतांना या माहितीचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार आहे. ही आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत गणनेवर लक्ष ठेवले जाणार आहे.यापूर्वीही 2013 रोजी ही गणना करण्यात आली होती.
दिलेल्या माहितीचा कुठलाही गैरवापर होणार नाही. याबाबत आश्वस्त असावे व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांनी केले आहे.


0 Comments