नागरिकांना उन्हाळ्यामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल याकडे लक्ष वेधावे
: ना. विजय वडेट्टीवार
पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा
चंद्रपूर दि. 16 मार्च : जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा होतो. त्या सर्व गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये उत्तम प्रतीचे पिण्याचे पाणी मिळेल यासाठी अस्तित्वात असणाऱ्या नळयोजना पूर्ण क्षमतेने काम करतील याकडे पाणी पुरवठा विभागाने लक्ष वेधावे, असे आवाहन राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील फ्लोराईडयुक्त गावे, दुर्गम भागातील गावे, पाणीपुरवठयाचा अभाव असणारी गावे, आदी ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या योजना पूर्ण क्षमतेने काम करेल यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्याच्या विकासात्मक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्याचे बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विभागांची बैठक पार पडली. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने राहून काम करावे अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा, रेतीचे अवैध उत्खनन सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी तयारी, पुनर्वसनाचे जिल्ह्यामध्ये रेंगाळलेले अनेक प्रकल्प, याशिवाय पुनर्वसन मध्ये ज्या नागरिकांवर अन्याय झालेला आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा या बैठकीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या बैठकीला कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जलसंपदा विभाग, भूमी अभिलेख विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.


0 Comments