दारूबंदी समीक्षा समितीकडून पालकमंत्र्यांना अहवाल सादर
समितीकडे 2.82 लक्ष सूचनांचा पाऊस ; 100 पानी अहवाल
समितीकडे 2.82 लक्ष सूचनांचा पाऊस ; 100 पानी अहवाल
चंद्रपूर, दि. 16 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी गठित समितीने आज राज्याचे बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे अहवाल सादर केला. यासंदर्भात पालकमंत्री काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
या अहवालाचा 25 फेब्रुवारी या अखेरच्या दिवसापर्यंत 2 लक्ष 82 हजार 412 सूचना आल्या होत्या. यामध्ये 3 हजार 431 इमेल सूचना असून 2 लक्ष 78 हजार 981 प्रत्यक्ष लेखी स्वरूपात आलेल्या सूचना आहेत.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी 27 जानेवारी रोजी या संदर्भात समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. राज्य शासनाने एप्रिल 2015 पासून जिल्ह्यामध्ये दारूबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला दारूबंदी बाबतच्या निर्णयाबाबत भिन्न मते मतांतरे असून यासंदर्भात पालकमंत्री यांच्याकडे लेखी व तोंडी निवेदने प्राप्त झाली होती. त्यानंतर या संदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या बंदीची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका चंद्रपूरचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांचा सहभाग आहे.
नियोजन भवनात आज या समितीने आपला अहवाल पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना सादर केला पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी या समितीच्या सर्व सदस्यांनी अतिशय मेहनतीने सादर केलेल्या या अहवालाच्या संदर्भात आवश्यक व्यासपीठावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तुर्तास प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक कामांवर लक्ष वेधावे, असे आवाहन केले आहे.


0 Comments