31 मार्चपर्यंत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सहकार्य करा : डॉ. कुणाल खेमनार

31 मार्चपर्यंत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सहकार्य करा
: डॉ. कुणाल खेमनार
Ø  चंद्रपूरमध्ये चार संशयित रुग्णाची तपासणी सुरू
Ø  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही करोना पॉझिटिव्ह नाही
Ø  सिनेमागृह, नाट्यगृह ,मॉल्स बंद करण्याचे आदेश
Ø  ताडोबातील परदेशी पर्यटकांची थर्मल स्क्रीनिंग करणार
Ø  गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचे आवाहन
Ø  चंद्रपूर जिल्ह्यातून विदेशात गेलेल्या व आलेल्या प्रवाशांची माहिती देण्याचे आवाहन
Ø  महाकाली यात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती सर्वत्र देण्याचे आवाहन
Ø  कोचिंग क्लासेसही बंद करण्याचे आवाहन
Ø  महानगरपालिका ,नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद करण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. 15 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य कोणत्याही दुकानांना सुरू करण्यास मज्जाव करण्यात आले आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल, जलतरण तलाव या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान 10 विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात आली असून ते सर्व निगेटिव्ह ( धोक्याबाहेर ) आढळून आले. रात्री उशिरा 4 संशयित रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात-रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे अहवाल बाकी असून आतापर्यंत जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी या परिस्थितीत शासनाकडून निघणाऱ्या निर्देशांचे पालन करून 31 तारखेपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये काढलेल्या आदेशांमध्ये सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना यामध्ये जलतरण तलाव, नाट्यगृह, सिनेमागृह, व्यायामशाळा, पानठेला, खर्रा विक्री केंद्र, बंद करण्याचा आदेश दिले आहेत. दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू, औषधी दुकान या आदेशातून वगळण्यात आले असून लग्न समारंभापासून तर गर्दी होऊ शकणाऱ्या सर्व योजनांना रद्द करण्याचे, पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध महाकाली मातेची यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू होत असते. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी ही यात्रा रद्द झाल्याबाबत अन्य जिल्ह्यातील नागरिकांना देखील माहिती पुरविण्याचे सर्व भाविक-भक्तांना निर्देशित करण्यात आले आहे. शहरांमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे. कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने अतिशय कडक निर्बंध राखले असून या अनुषंगाने शाळा, कॉलेज व गर्दीचे आयोजन बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आजार पसरणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
4 संशयित रुग्ण दाखल
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात विदेशातून आगमन झालेल्या दहा नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. हे सर्व नागरिक निगेटिव्ह आढळून आले असून यासंदर्भात कोणताही धोका नाही. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा 4 संशयित रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात-रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय यंत्रणा या रूग्णांवर लक्ष ठेवून असून उद्यापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे. कोरोना आजाराबाबत घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले असून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात योग्य ती उपचार यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात उद्भवणे नये याकरिता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस एन मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांची नियुक्ती सनियंत्रक म्हणून करण्यात आलेली आहे.
संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती
तसेच गृहविभाग, महसूल विभाग यांचे संपर्क अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर हे असणार आहे. आरोग्य विभाग, रेडक्रॉस, लायन्स क्लब, रोटरी क्लब व इतर सेवाभावी संस्था, शिक्षण अधिकारी  माध्यमिक, प्राथमिक या विभागाचे संपर्क अधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, जिल्हा परिषद चंद्रपूर, महानगरपालिका चंद्रपूर, सर्व नगरपरिषद या विभागाचे संपर्क अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी जे. पी .लोंढे हे असणार  तर अन्न व प्रशासन विभागाचे संपर्क अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन हे असणार आहेत. या सर्व संपर्क अधिकारी यांना निवडून दिलेल्या विभागाशी संपर्कात राहून त्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे वेळोवेळी सादर करायची आहे. जिल्ह्यातील आजारास संदर्भातील माहिती दर 2 तासांनी जिल्हा शल्यचिकित्सक मार्फत राज्य शासनाला दिली जात आहे.
विविध गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत जिल्ह्यातील गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी असेल याव्यतिरिक्त लग्नसमारंभ, आठवडी बाजार यांना काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये परिसर स्वच्छ ठेवणे, सतत हाताळल्या जाणाऱ्या वस्तू जसे दरवाज्याचे हॅन्डल, टेबले, खुर्ची, जीन्यावरील रेलिंग इत्यादींची वारंवार स्वच्छता ठेवणे, स्वच्छता करताना चांगल्या दर्जाचे सॅनीटायझर वापरणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना वैयक्तिक दर्जाचे संरक्षणासाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात पुरविणे, कार्यक्रमाचा कालावधी अनावश्यक वाढवू नये, गर्दीचे नियंत्रण करावे एकाच वेळी जास्त लोक जमणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शासन व आरोग्य विभागाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
ताडोबात परदेशी पर्यटकांचे थर्मल  स्क्रीनिंग
विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी थर्मल डिटेक्टरनी पर्यटकांचे थर्मल  स्क्रीनिंग केल्या जाते. त्याचप्रमाणे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्याच बरोबर परदेशी पर्यटकांचे नाव, कुठून आलेत त्या देशाचे नाव, संपर्क क्रमांक, कुठे थांबलेले आहेत, यानंतर कुठे जाणार आहेत तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक याबाबतची संपूर्ण माहिती नोंद करण्यात येणार आहे.
चित्रपटगृहे, मॉल्स बंद करण्याचे आदेश
जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने व आस्थापना ज्यामध्ये जलतरण तलाव, नाट्यगृह, सिनेमागृह, व्यायामशाळा, पानठेला, खरा विक्री केंद्र दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु, अत्यावश्यक किराणा सामान, दूध व भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय सुरुच असणार आहेत.
परदेशातून येणाऱ्यांवर पाळत
जिल्ह्यातील जे कोणी नागरिक आपले टूर एजन्सीच्या माध्यमातून बाहेर देशात प्रवासाकरीता, पर्यटनाकरिता गेलेले असतील अशा सर्व नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात व पोलिस अधीक्षक कार्यालयात कळविण्यात यावी सदर माहिती ही प्रशासनातर्फे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
अफवा पसरविल्यास होणार कारवाई
कोरोना विषाणू संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर मार्गाने अफवा पसरविल्या कारवाई  होणार आहे. या सर्व हालचालींवर सायबर सेलची करडी नजर असणार आहे. काही चुकीच्या बातम्या, पोस्ट, सोशल मीडियावर दिली गेल्यास अशा चुकीच्या बातम्या फसविणाऱ्या सोशल मीडियावरील ग्रुपचे अॅडमीन, वेबसाईटचे कथित पत्रकार व माध्यम प्रतिनिधीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी लक्ष वेधण्याचे निर्देश सायबर सेलला दिले आहे. या परिस्थितीत सामाजिक जाणीव ठेवून समाज माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही  वेबसाइटवरून तथाकथित पत्रकार जिल्ह्यामध्ये अफवा पसरवत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा बंद करण्याचे निर्देश
दरम्यान काल जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे महानगर पालिका हद्दीतील तसेच नगरपालिका नगर पंचायत हद्दीतील खाजगी जिल्हा परिषद व अन्य संस्थान मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी  दिपेन्द्र लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गाव पातळीवरील शाळा बंदचे अद्याप आदेश नाहीत. मात्र महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोचींग क्लासेस बंद ठेवा
जिल्हाभरातील सर्व कोचिंग क्लासेस मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असतात विद्यार्थ्यांच्या जीविताला कुठल्याही पद्धतीचा धोका संभवू नये त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरीच राहणे योग्य असून या काळात सर्व कोचिंग क्लासेसच्या मालकांनी, संचालकांनी शासनाला सहकार्य करावे. कोचिंग क्लासेस बंद करण्यात यावे ,असे आवाहनही  जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
अशी घ्यावी प्रतिबंधात्मक खबरदारी :
श्वसनसंस्थेचेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकटचा सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता करणे व वारंवार पाणी व साबणाने हात स्वच्छ धुणे, न शिजलेले अथवा अपुरे शिजलेले मांस खाऊ नये, खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल, टिशू पेपरचा वापर करावा, हस्तांदोलन तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, रुग्ण असलेल्यांनी व आरोग्य सहाय्यक यांनी एन 95 मास्क वापरावे, सामान्य जनतेनी एन 95 मास्क वापरणे गरजेचे नाही ते रुमाल सुद्धा वापरू शकतात.
श्वसनास  त्रास होणाऱ्या व्यक्ती तथा रुग्णाने नुकताच कोरोना बाधित क्षेत्रातून प्रवास केला असल्यास विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
एखादी व्यक्ती कोरोना बाधित देशातून, क्षेत्रातून आला असेल किंवा अशा प्रकारचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे तात्काळ संपर्क साधावा तसेच राज्यस्तरावर संपर्क कक्ष दूरध्वनी क्रमांक 020-26127394 व टोल फ्री क्रमांक 104 व चंद्रपूर जिल्ह्यासाठी  ०७१७२-२६१२२६  क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments