100 टक्के अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना सुरु

 



100 टक्के अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना सुरु

◾गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गटई स्टॉल ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेत महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्रात 100 टक्के  शासकीय अनुदान तत्वावर पत्राचे स्टॉल देण्यात येतात.

महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत आहे. त्यांची उपजिविका ही या व्यवसायावर अवलंबून आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. या व्यावसायिकांना ऊन, वारा व पाऊस यांपासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

गटई स्टॉल योजनेचे अर्ज सहायक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण चंद्रपुर या कार्यालयाकडे उपलब्ध आहे. तरी या योजनेचा अनुसूचित जातीच्या गटई कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

पात्रतेचे निकष : 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनु, जातीतील संवर्गातील असावा. 2.अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 80 हजार व शहरी भागासाठी 1 लाखांपेक्षा अधिक नसावे. (तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील) अथवा अर्जदार दारिद्रय रेषेखालील असावा. 3. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. 4. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड (कटक मंडळ) किंवा महानगरपालिका यांनी अर्जदारास भाडयाने, कराराने, खरेदीने, अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.

अर्ज कसा असावा : अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय चंद्रपुर येथे सादर करावा.

अटी व शर्ती :1. एकदा लाभार्थ्यांना स्टॉलचा लाभ दिल्यानंतर या स्टॉलची देखभाल, त्याची दुरुस्ती इत्यादी बाबी संबंधित लाभार्थ्यांनी करणे आवश्यक राहील. 2. गटई पत्र्याचे स्टॉल हे एका घरात एकाच व्यक्तीला दिले जातील. 3. ग्रामीण भाग, अ, ब, क वर्ग नगरपालिका तसेच महानगरपालिका क्षेत्रात व छावणी क्षेत्रात (कटकमंडळ) सदर गटई स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी गटई कामगारांची राहील. 4. एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही. तसेच ते भाडे तत्वावर किंवा स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. 5. स्टॉलधारकाने सदर स्टॉल कोणत्या जागेत निश्चित केला आहे यासाठी. स्टॉलधारकाचे त्याच्या स्टॉल व जागेसह जिओ टॅगींग छायाचित्राचे रेकॉर्ड सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. 6. ज्या कारणासाठी गटई स्टॉल देण्यात आलेला आहे, त्याशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी वापरण्यात आला तर संबंधित लाभार्थ्यांकडून दिलेले अनुदान वसूल करण्यात येईल व दिलेला स्टॉल रद्द करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : 1. अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला 2. उत्पन्नाचा दाखला 3. शाळा सोडल्याचा दाखला 4. रेशन कार्डाची झेरॉक्स (साक्षांकित प्रत) 5. आधार कार्डची झेरॉक्स प्रत 6. आधार संलग्न असलेले बँक खाते प्रत. 7. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे. ती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांनी भाड्याने/कराराने/खरेदीने/स्वमालकीची असल्याबाबतची भाडे चिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी खात्याची साक्षांकित प्रत 8. ग्रामसेवक / सचिव यांचे गटई काम करीत असल्याचे प्रमाणपत्र 9. असा व्यवसाय करीत असल्याबाबतचे ग्रामपंचायत/नगरपालिकेचे व्यवसाय प्रमाणपत्र व या जागेवर बसून काम करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय करतानाचा पोस्टकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. 10. अधिवास प्रमाणपत्र

संपर्क : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपुर (07172 -253198) अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, शासकीय दुध डेअरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे संपर्क करावा.





Post a Comment

0 Comments