पत्रकार हल्ला प्रकरणातील आरोपीना अटक करून कठोर कारवाई करा- चिमूर तालुका व्हॉईस ऑफ मीडिया
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीचे निवेदन चिमूर तालुका व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्रा. राजू रामटेके यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना सादर करून पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.
दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी (शनिवार) त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्के आदींनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चिमूर उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना म्हटले की, पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे.
या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या.
निवेदन सादर करताना व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्रा. राजू रामटेके, जिल्हा सरचिटणीस श्रीहरी सातपुते, जितेंद्र सहारे, वंदना घोनमोडे, उमेश शंभरकर, नितीन पाटील, राजकुमार चुनारकर, विकास खोब्रागडे, प्रमोद राऊत, संजय नागदेवते, फिरोज पठाण, रामदास ठुसे, विलास कोराम, योगेश सहारे, रामदास हेमके, भरत बंडे यासह बहुसंख्येने पत्रकार व पत्रकार हितचिंतक उपस्थित होते.
0 Comments