आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून कंत्राटी संगणक चालकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी!
◾नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 15.35 कोटी निधी मंजूर
◾सहा महिन्यांपासून रखडले होते मानधन
◾कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन मिळणार आहे. यासाठी कंत्राटी संगणक चालकांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. यामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही समावेश आहे. हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना नोकरीत सुरक्षितता नाही. शिवाय मानधनही कमी आहे आणि ते वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत मानधन मिळावे, यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.
आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्षांपासून शासकीय कामकाज करत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत असुरक्षितता तर असतेच पण मानधनही कमी असते. इतर शासकीय सोयी सुविधादेखील मिळत नाहीत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटुनही अनुदान न आल्याचे कारण पुढे करत मानधनापासून वंचित ठेवले जाते. दर महिन्याच्या एक तारखेला मानधन मिळावे, अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची दीर्घकालीन मागणी आहे. हे सर्व कर्मचारी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. नियमित मानधन न मिळाल्याने त्यांना सामाजिक संघर्षाला नेहमीच तोंड द्यावे लागते,’ याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले होते.
आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर अखेर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने एक शासन निर्णय जारी केला असून, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कर्मचाऱ्यांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेअंतर्गत जिवती येथे कार्यरत असलेले कंत्राटी संगणक चालक के. एम.कोटनाके यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करत आ. सुधीर मनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. ‘गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आमचे मानधन मिळण्याबाबत अडचणी होत्या. ही अडचण सोडवण्या संदर्भात आम्ही आ. मुनगंटीवार यांच्याकडे जाऊन समस्या सांगितली. त्यांनी तातडीने या विषयाचा पाठपुरावा केला आणि आमची मोठी अडचण दूर केली,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
0 Comments