लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

 









लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.  व्यवहारे

◾उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्हा हा निसर्ग संपन्न, औद्योगिक दृष्ट्या प्रगत तसेच विविधतेने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य जपण्यासाठी तसेच शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचवून लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी महसूल विभाग नेहमी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिली. 

नियोजन सभागृह येथे महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, शुभम दांडेकर, अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, रवींद्र माने, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुरेश चोपणे, अधीक्षक नरेंद्र बहिरम आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, शासनाच्या निर्देशाप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन व 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ आजपासून झाला असून यात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रशासनात पूर्वीच्या आणि आताच्या कामकाजात अमुलाग्र बदल झाला आहे. अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानस्नेही काम आता महसूल विभागाकडून होत आहे. महसूल प्रशासनावर शासनाने टाकलेली जबाबदारी निश्चितच पूर्ण करण्याचा सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांचा मानस आहे, असेही डॉ. व्यवहारे यांनी सांगितले. 

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, महसूल विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. प्रशासनाची खरी अंमलबजावणी या विभागाकडून होत असते. महसूल विभागाने ‘क्यू आर’ कोड म्हणजे क्वॉलिटी रिस्पॉन्स देणे तसेच ‘क्यू आर’ म्हणजे क्वाँटिटी रेकॉर्ड देऊन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे. आपल्या राज्याचे शासन प्रशासन अतिशय चांगले आहे. राज्याला अग्रगण्य ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. 

आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम महसूल विभागाचे असून हा विभाग 365 दिवस 24 बाय 7 कार्यरत असतो. महत्त्वाची जबाबदारी या विभागावर असून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक कामे जिल्ह्यात करता येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुरेश चोपणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी केले. संचालन अजय मैकलवार यांनी तर आभार नरेंद्र बहिरम यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, सहाय्यक महसूल अधिकारी हेमंत उमरे, महेश भैसार, मंडळ अधिकारी किरण मोडकवार, ग्राम महसूल अधिकारी प्रतिभा येरमे, महसूल सहाय्यक चंदू आगलावे, यांच्यासह शिपाई, संगणक चालक, सेतु संचालक, पोलीस पाटील, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच महसूल दिनानिमित्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात योगिता वासनिक, मंगला गणफाडे, नीलिमा गोंगले, माला वाढाई, शकुंतला बलखंडे,  वारलू चौधरी, शंकर मडावी आदींचा समावेश होता.




Post a Comment

0 Comments