ऑनलाईन गेमिंग अॅप्स बंद करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणार - आमदार किशोर जोरगेवार
◾आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची अॅक्शन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : ऑनलाईन गेमिंग अॅप्समुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सदर अॅप्स बाबत कायदा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे नसला तरी आपण केंद्र सरकारकडे अॅप्स बाबत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ऑनलाइन गेमिंग अॅप्समुळे आत्महत्यांचे अनेक प्रकार समोर आले असून, अनेक गुन्हे देखील नोंदवले गेले आहेत. मात्र राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ ९७ गुन्हे दाखल झाल्याचे उघड झाले आहे. ही संख्या प्रत्यक्षात अत्यंत कमी असल्याचे सांगत युवा पिढीला जुगाराची सवय लावणाऱ्या ऑनलाइन गेमिंग अॅप्सविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती.
सभागृहात या विषयावर प्रश्न उपस्थित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ‘जंगली रमी’, ‘ड्रीम इलेव्हन’, ‘एमपीएल’, ‘माय इलेव्हन सर्कल’, ‘वन एसबीटी’ या कंपन्या टीव्हीवर जाहिराती देत असून युवकांना जुगाराच्या सवयी लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. नामवंत सेलिब्रिटी अशा कंपन्यांच्या जाहिराती करतात, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सदर अॅप्स बाबत आपण केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. सदर प्रकारावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. त्यामुळे आपण केंद्र सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बेपत्ता महिला व मुलींसाठी मिसिंग सेल
संपूर्ण राज्य आणि चंद्रपूरात सुद्धा महिला व मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता झाल्या आहेत. यातील बहुतेकांचा शोध लागला असला तरी अनेक अद्यापही बेपत्ता असल्याचे अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना अशा प्रकरणांमध्ये महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी आपण प्रत्येक पोलिस ठाण्यात मिसिंग सेल सुरू केले असल्याचे म्हटले आहे.
0 Comments