भाजप मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर – संघटनेला नवे बळ मिळणार : आमदार किशोर जोरगेवार
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील विविध मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे आयोजित विशेष बैठकीत या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात आला.
प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री माधवी नाईक, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर आदींची उपस्थित होती.
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी महामंडळ अध्यक्ष पदाकरिता दिलेल्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांचा अनुभव, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य यावर आधारित विचार करून या नावांना प्रदेश नेतृत्वाकडून मान्यता देण्यात आली.
या नियुक्त्यांमध्ये तुकूम मंडळासाठी स्वप्नील डुकरे, बाजार वार्ड मंडळासाठी सुभाष अदमाने, सिव्हिल लाईन मंडळासाठी रवि जोगी, बापूपेठ मंडळासाठी प्रदीप किरमे, बंगाली कॅम्प मंडळासाठी अॅड. सौ. सारिका संदूरकर तसेच चंद्रपूर ग्रामीणसाठी विनोद खेवले यांची निवड करण्यात आली आहे.
या नवीन नियुक्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीच्या महानगर संघटनेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळात भाजपाचा विचार पोहोचवणे, पक्षाचे ध्येयकार्य जनतेपर्यंत नेणे आणि संघटना मजबूत करणे हे या नव्या अध्यक्षांचे महत्त्वाचे काम असेल.
महानगरातील भाजप संघटना अधिक सक्षम करण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान, जबाबदारी वाटप आणि संघटन विस्तार हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ही नियुक्ती म्हणजे संघटनात्मक बांधणीची एक महत्त्वाची पायरी आहे. सर्व मंडळ अध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रात संघटना वाढवावी, जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न करावेत आणि भाजपाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
0 Comments