चंद्रपूर क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरक्षेचा अभाव

 



चंद्रपूर क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरक्षेचा अभाव

◾फिसलणाऱ्या टाईल्स आणि प्रशिक्षकांच्या कमतरतेवरून चिंता व्यक्त


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा संकुलामध्ये मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिमायू अली यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संकुलातील त्रुटी आणि प्रशासनाची उदासीनता याकडे लक्ष वेधले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, क्रीडा संकुलातील जलतरण तलावाभोवती मार्बलच्या टाईल्स बसवण्यात आल्या असून त्या सातत्याने ओल्या राहत असल्यामुळे प्रचंड फिसलन होत आहे. यामुळे दररोज लहान मुले, युवक आणि वृद्ध यांना घसरून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित बाबत आधीही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती, मात्र अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

अली यांनी यासोबतच असेही नमूद केले की, सध्या तीन वेगवेगळ्या संस्थांमार्फत जलतरण तलावात मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, पण तिथे कोणताही अधिकृत आणि प्रशिक्षित प्रशिक्षक नियुक्त केलेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून मुलांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिमायू अली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत.

1. जलतरण तलावाभोवती असलेल्या फिसलणाऱ्या टाईल्स तात्काळ बदलाव्यात किंवा त्याचे योग्य दुरुस्ती काम करावे.

2. फक्त प्रमाणित व अधिकृत जलतरण प्रशिक्षकांमार्फतच प्रशिक्षण देण्याची परवानगी दिली जावी.

3. संपूर्ण क्रीडा संकुलाच्या सुरक्षेची पुन्हा एकदा तपासणी करून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

 अली यांनी प्रशासनाकडे जनहित आणि विशेषतः मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. 

यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कांबळे, हाजी अली, सिद्धार्थ शेवगावकर उपस्थित होते.

आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे किती गांभीर्याने आणि तातडीने प्रतिसाद देते.




Post a Comment

0 Comments