लोणकर व्यसनमुक्ती केंद्रात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व इंडियन डेंटल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लोणकर व्यसनमुक्ती, उपचार व पुनर्वसन केंद्र, आरवट येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
यावर्षीचा संदेश होता - "आकर्षणाचा मुखवटा उतरवूया : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया". कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढवणे व COTPA 2003 ( सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा-२००३ ) याची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणे असा होता.
कार्यक्रमात डॉ. राजेश टोंगे ( इंडियन डेंटल असोसिएशन ) यांनी व्यसनांमुळे जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता सावलीकर ( जिल्हा सल्लागार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ) यांनी तंबाखूच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम व तंबाखू उद्योगांच्या फसव्या प्रचाराची माहिती दिली. तसेच मौखिक कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आकाश कासटवार यांनी मुख कर्करोगाची लक्षणे, सुरुवात व उपचार पद्धती स्पष्ट केली.
समुपदेशक मित्रांजय निरंजने यांनी व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचार व पुनर्वसन सेवांविषयी माहिती दिली. तुषार रायपूरे यांनी उपस्थित नागरिकांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. सर्व उपस्थितांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. राजेश डोंगरे ( प्रेसिडेंट, IDA ), डॉ. पियुष लोधे ( सेक्रेटरी ), डॉ. भार्गव भांडे, डॉ. अमर दुर्योधन, डॉ. आकाश कासटवार, डॉ. श्वेता सावलीकर, मित्रांजय निरंजने व तुषार रायपूरे यांचा मोलाचा सहभाग होता. आयोजकांनी तंबाखूमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0 Comments