घुग्घुस शहरातील जड वाहतुकीसंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश निर्गमित

 



घुग्घुस शहरातील जड वाहतुकीसंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश निर्गमित

 17 ऑक्टोबर ते 16 जानेवारीपर्यंत आदेश लागू


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : घुग्घुस  शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. या वाहतुक समस्येबाबत दि. 17 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाच्या नियमनासाठी घुग्घुस शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच जनतेला त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे अनुचित प्रकार घडून जिवित किंवा वित्तहानी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या संदर्भात नव्याने उपाययोजना करण्याचे आवश्यक झाले आहे.

घुग्घुस शहरात जड वाहनांना प्रतिबंध घालण्याचे प्रस्तावित करण्याबाबत या कार्यालयाकडून जाहीर सूचना दि. 23 ऑगस्ट 2022 अन्वये प्रस्तावित करण्यात आले होते. व यासंदर्भात जनतेकडून संयुक्तीक लेखी सूचना व आक्षेप देखील मागविण्यात आले होते. जनतेकडून आक्षेप प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन रितसर सुनावणी घेण्यात आली.

कायदेशीर अधिकारान्वये रहदारीस अडथळा होऊन जनतेस त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये, अपघात होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्व संबंधितांची संमती आहे,असे गृहीत धरून वाहतूक संदर्भात दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजीच्या दुपारी 12 वाजतापासून ते दि. 16 जानेवारी 2023 पर्यंत आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने घुग्घुस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतुकीस बंद राहील. घुग्गूस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पिटल-बेलोरा ओवर ब्रिज मार्गे वणीकडे जाणारा रस्ता जड वाहतुकीस बंद राहील. तर पर्यायी मार्ग म्हणून वणीकडून घुग्गूसकडे येणारी जड वाहतूक राजीव रतन हॉस्पिटल पर्यंत येऊ शकेल. वणीकडून घुग्गूस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा पाटाळा-वरोरा-भद्रावती-ताडाळी-पडोली घुग्गूस मार्गाचा अवलंब करावा. घुग्घुसकडून वणी जाण्याकरीता पडोली-भद्रावती-वरोरा मार्गाचा अवलंब करावा. असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments