११ डिसेंम्बर राष्ट्रीय लोक अदालत चंद्रपुरात लोकअदालतीत ५२५ प्रकरणे निकाली

 

११ डिसेंम्बर राष्ट्रीय लोक अदालत चंद्रपुरात लोकअदालतीत ५२५ प्रकरणे  निकाली 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाद्वारे जिल्हा सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. लोकअदालतीदरम्यान ८ ते १० डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवून ५२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. कोरोनाच्या काळात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले नाही. ऑगस्ट महिन्यापासून लोकअदालत घेणे सुरू झाले. त्यानुसार आजची ही लोक अदालत तिसरी आणि यावर्षातील शेवटची आहे. राष्ट्रीय लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले.

याप्रसंगी प्रथम जिल्हा न्यायाधीश विरेंद्र केदार, दिवाणी न्यायाधीश प्रशांत काळे, श्रीमती अन्सारी मॅडम, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव यांची उपस्थिती होती.

न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यात अनेक पिढ्या निघून जातात. मात्र, न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन वेळेत न्याय देण्यासाठी सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. झटपट निकाल हे लोक अदालतीचे वैशिष्ट्य आहे. यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली निघण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांनी केले. जिल्हा सत्र न्यायालयातर्फे ८ ते १० डिसेंबर या तीन दिवसांत विशेष मोहिम राबवून ५२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात पक्षकार, विधिज्ञ, न्यायाधीश, शासकीय आणि निमशासकीय सर्व विभागांचे सहकार्य लाभले आहे.

लोक अदालतीच्या माध्यमातून पक्षकारांची चांगली समजूत काढून जास्तीत-जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे प्रयत्न आहे. मागच्या अदालतीमध्ये तीन हजार ५५८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालतीमध्ये जवळपास दहा हजार प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. यात दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन.आय. अक्ट (धनादेश न वटणे-चेक बाउन्स) वित्त संस्था, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, इलेक्ट्रिसिटी अक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस प्रकरणे, तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी, वीजबिल आदींचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments