महाविकास आघाडीला मोठा धक्का विधान परिषद निवडणूक नागपूर व अकोल्यात भाजपा विजयी
◾नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यातून वसंत खंडेलवार विजयी !
नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत नागपूर व अकोला -वाशीम-बुलडाणा या मतदार संघात भाजपाने विजयाचा गुलाल उधळला आहे. नागपूरमधून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे हे भरघोश मतांनी विजयी झाले असून अकोला-वाशीम-बुलडाणा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे विरोधीपक्ष असलेल्या भाजपाच्या गोटात आनंद असून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी हा पराभव मोठा झटका देणारा आहे.
नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. काँग्रेसने छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. ते पराभूत झाले आहेत
नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र, ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपच्या नियोजनाला यश आले आहे. या निवडणुकीत 559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.
तर दुसरीकडे अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातोय. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना तर राष्ट्रवादी काँग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत तर 130 तर भाजपाकडे 244 मते आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार होते. महाविकास आघाडीची एकूण 396 मते होती. मात्र, गोपिकिशन बाजोरिया यांना 331 मते मिळाली आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मते फुटल्याचे समोर आले आहे.


0 Comments