चंद्रपूर शहरात मुखदर्शनास प्रतिबंध; ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : श्रद्धा, भक्ति, उत्साह आणि संघटन शिकवणारा गणेश उत्सव आज मोठ्या भक्तीभावात सुरु झाला. कोरोना पार्श्वभूमीवर हा उत्सव आला असल्यामुळे दरवेळी प्रमाणे गर्दी न करता कोरोना प्रोटोकॉल पाळत हा उत्सव साजरा करण्याच्या राज्यशासनाच्या सूचना आहेत. चंद्रपूर शहरात प्रत्यक्ष किंवा मुखदर्शनास प्रतिबंध घालण्यात येत असून, गणेशाचे दर्शन ऑनलाईनच घेता येणार आहे. त्याचे गणेश भक्त व सार्वजनिक मंडळांनी पालन करावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
गणेशोत्सव साजरा करतांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. मंडप सुसंगत, मर्यादित आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे उभारावे. सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी. सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती ४ फूट तर घरगुती मूर्ती २ फुटांची असावी. शाडूची किंवा पर्यावरणपुरक मुर्ती असल्यास घरी विसर्जन करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा मनपाच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे. घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. तसेच मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडाचा लाभ घ्यावा, विसर्जनासाठी मिरवणूक काढू नये, असेही आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
गणेश मंडळानी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंग व्यवस्था असावी. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना थेट मुखदर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शन देण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









0 Comments