तेलंगणा राज्यातून काेराेना बाधितांचे येणारे मृतदेह थांबवा
🔹 जिल्हाधिकारी यांना उपसरपंचाचे साकडे
🔹 अनेकश्वर मेश्राम यांचे निवेदन
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात काेराेना संक्रमण स्थिती बिकट झाली आहे. वैद्यकीय सुविधा अपुरी पडत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीव गमवावा लागू नये म्हणून जिल्ह्यातील काेराेना बाधितांचे नातेवाईक शेजारच्या तेलंगणा राज्यात उपचारासाठी धाव घेत आहेत. मात्र काेराेना बाधितांचे निधन झाल्यावर मृतदेह नातेवाईक चंद्रपूर जिल्ह्यात घेऊन येत आहेत. हा प्रकार थांबविण्यात यावा. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करावी, अशी मागणी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन सादर करून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, काेरपना, जीवती व गाेंडपिपरी तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेलगत आहे. जिल्ह्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढले आहे. काेराेना बाधितांची वाढती संख्या विस्फोट करणारी आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ताेकडी पडत आहे. काेराेना संक्रमणातून जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली आहे. अशातच आवश्यक आरोग्य सुविधांचा तुटवडा काेराेना बाधितांच्या जीवावर उदार झाला आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, गाेंडपिपरी, काेरपना व जीवती तालुक्यातील काेराेना बाधितांचे नातेवाईक रूग्णांना घेऊन शेजारच्या तेलंगणा राज्यातील मंचेरिअल येथे उपचारासाठी धाव घेत आहेत.
काेराेना बाधितांचा जीव वाचावा म्हणून नातेवाईक धडपड करत आहेत. मात्र तेलंगणा राज्यात उपचारादरम्यान काेराेना बाधितांचा मृत्यू झाल्यावर, तो मृतदेह नातेवाईकांच्या सुपुर्द केला जात आहे. नातेवाईक काेराेना बाधितांचा मृतदेह वाहनातून जिल्ह्यात आणत असल्याने काेराेना संक्रमण वाढत आहे. आजतागायत तेलंगणा राज्यातून ८ ते १० काेराेना बाधितांचे निधन झाले असून नातेवाईक ते मृतदेह घेऊन जिल्ह्यात घेऊन आले आहेत. या प्रकारापासून जिल्हा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काेराेना बाधितांचा मृत्यू झाल्यावर, त्या पार्थिव देहावर आरोग्य विभागाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाते. मात्र तेलंगणा राज्यातून काेराेना बाधितांचा मृतदेह आणले जात आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने शेजारच्या तेलंगणा राज्यातून काेराेना बाधितांचे निधन झालेले मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात येणारे त्वरित थांबवा, अशी मागणी विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा वेंटिलेटर आली आहे. वैद्यकीय प्राणवायू, लसींचा तुटवडा, काेराेना बाधितांना वेळीच उपचार न मिळणे, सर्वांची जीव वाचवण्यासाठी धडपड, काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने शासनाच्या व प्रशासनाच्या व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहे. जिल्ह्यात काेराेना बाधितांवर उपचार करणे, शक्य होत नाही म्हणून नातेवाईक रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात धाव घेत आहेत. मात्र तेलंगणा राज्यात देखील काेराेना बाधितांचा जीव वाचवू शकत नाही. गावात काेराेना बाधितांचा मृतदेह आणला जातो. मात्र तेलंगणा राज्यातून काेराेना बाधितांचा मृतदेह आल्याने, गावातील लोक अंत्यसंस्कार करू देत नाही. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असाच प्रकार शनिवारी राजुरा तालुक्यातील साखरी गावात घडला. मरणातून देखील मृतदेहाची याचना, काेराेना संक्रमण काळाने आणून साेडली आहे.




0 Comments