चीन मुद्द्यावरील सरकारचे अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : भारताच्या सीमेवर चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्यानंतर आक्रमकपणे देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारले. त्यावेळी चीनचे सैन्य भारतात आले नाही असा दावा पंतप्रधानांनी केला होता. मात्र आता हेच पंतप्रधान चीनच्या सैन्याने भारताच्या सीमेवरून दोन किमी माघार घेतली असल्याचे सांगत आहे. सत्ताधारी पक्षाच्या विधानांमध्ये विसंगती आढळून आल्याने राहुलजी गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने भाजपाने आता राजीव गांधी फाउंडेशनची, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीन संस्थानाची चौकशीची मागणी करण्यात यावी अशी मागणी करत चीन मुद्द्यावरील सरकारचे अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. ज्याप्रमाणे राजीव गांधी फाउंडेशन ची चौकशी सरकार करणार आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सहाय्य्यता निधी,विवेकानंद फाउंडेशन, ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेप, इंडिया फाउंडेशन, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना मिळणाऱ्या फंडिंगची देखील चौकशी झाली पाहिजे. आज सर्वाधिक फंडिंग असणारा पक्ष म्हणून भाजप ची ओळख आहे. ही फंडिंग नेमकी या पक्षाकडे कुठून येते याची सखोल चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. दरम्यान लोकशाहीत विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करणे हे संविधान विरोधी कृती असल्याचे मत देखील त्यांनी मांडले.



0 Comments