सिरोंचा येथील त्या रुग्णाचे निदान आणि मृत्यू हैद्राबाद येथे


सिरोंचा येथील त्या रुग्णाचे निदान आणि मृत्यू हैद्राबाद येथे

कोरोना लागणही जिल्हयात झाली नसल्याचे आरोग्य विभागाचे मत

गडचिरोली(राज्य रिपोर्टर) संपत गोगूला : सिरोंचा येथील नागरिकाचा दुदैवी मृत्यू हैद्राबाद येथे ह्रदयविकार उपचार सुरू असताना झाल्याचे आरोग्य विभाग गडचिरोली यांनी कळविले आहे. सदर ह्रदयविकार असलेला रुग्ण गेल्या सात ते आठ वर्षांपासून ह्रदयविकारावर हैद्राबाद आणि चंद्रपूर येथे उपचार घेत होता. सदर व्यक्ती उपचारासाठी चंद्रपूर येथे गेला व त्यानंतर तो सिरोंचा येथे गेल्यानंतर बारा तासातचा उस्मानिया मेडिकल कॉलेज हैद्राबाद येथे पुढिल उपचारासाठी रवाना झाला. त्या ठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले. व त्याच ठिकाणी तो कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. त्यानंतर गांधी रूग्णालय हैद्राबाद येथे दि.1 जून रोजी सायंकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे आरोग्य विभाग गडचिरोली यांनी गांधी रूग्णालय हैद्राबाद यांचेकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे कळविले आहे.
आरोग्य विभाग गडचिरोली यांना त्या रूग्णाला चंद्रपूर येथे कोरोना लागण झाल्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हयातील त्याच्या बारा तासातील वास्तव्यादरम्यानच्या तीनही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी काल पासूनच आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. सदर रूग्ण हा जिल्हयाबाहेर बाधित झाला आहे. तसेच त्याचा दुदैवी मृत्यूही हैद्राबाद येथे झाला आहे. संपर्कातील लोकांचा शोध पूर्ण झाला असून दिडशेहून अधिक लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments