धान पिडीकेव्ही-तिलक शेतकऱ्यांना
वरदान ठरणार :डॉ. विनोद नागदेवते
महाबीज धानाचा वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 10 जून(राज्य रिपोर्टर): डॉ. पंजाबराव कृषि विद्यापिठ, अकोला मार्फत बारीक धानामध्ये पिडीकेव्ही-तिलक जातीचे संशोधीत वाण 2018 साली शेतकऱ्यांसाठी प्रसारीत केले. सदर वाण पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. हे वाण दाया एक्स एसवायई-632003 या दोन वाणापासून संकरीत करण्यासाठीच्या पेडीग्री पध्दतीने तयार केलेले आहे. हे वाण ठेंगणे व न लोळणारे असून मळणीसाठी सोईस्कर आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे कार्यक्रम समन्वयक डॉ.विनोद नागदेवते यांनी व्यक्त केले आहे.
या वाणाची उंची 105-110 सेमी असुन 140-145 दिवसात उशीराने पक्व होणारे आहे. सदर वाण खोडकीडा, गादमाशी व मानमोडीला साधारण प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे हजार दाण्याचे वजन 12.02 ते 13.00 ग्रॅम असुन या धानाची मिलींग टक्केवारी 70.40 आहे. तर धानाचा आकार आखुड निमुळता,बारीक आहे.अमायलोज 22.26 टक्केवारी असल्याने भात शिजण्यास उत्तम आहे व खाण्यास रुचकर आहे. या वाणाला 20*15 सेमी अंतराने लावल्यास 3 लाख 33 हजार 333 झाडे एका हेक्टरवर लावल्यास 40-42 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन असल्याने शेतकऱ्यास वरदान ठरणार आहे.
धान पिडीकेव्ही-तिलक या वाणाच्या 25 किलो वजनाच्या बॅगच किंमत 1 हजार 50 रु. असून शासनाकडून 500 प्रतिबॅग अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना 25 किलोची बॅग रु. 550 ला महाबीजने 40 विक्रेते व उपविक्रेते यांचेकडे जिल्ह्यात 300 क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन नागपूर विभागाचे महाबीजचे विभागिय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.



0 Comments