तरुणांनी सहकार चळवळीत येण्याची गरज
– बाळासाहेब पाटील
मुंबई, दि. 13 : राज्याच्या सहकार चळवळीला मोठा इतिहास लाभला आहे. सहकाराचा हा वारसा तरुणांनी जोपासून सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयंत पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या दुरावस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. राज्याला साठ वर्ष पूर्ण होणार आहे. या साठ वर्षाच्या राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकार चळवळीचे मोठे योगदान राहिले आहे. राज्यात यंदा १४६ साखर कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पुराचा फटका साखर उत्पादनाला बसला नाही. साखर कारखान्यांसाठी आवश्यक असलेल्या कर्जाचे पुनर्गठन, व्याज, थकबाकी यासंदर्भात सभापती रामराजे नाईक –निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १७ मार्च रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
अल्पकालीन चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य प्रशांत परिचारक यांनी भाग घेतला.


0 Comments