अल्पकालीन चर्चा विधान परिषद
बँकांतील ठेवीसंदर्भात नगरपालिका,
महानगरपालिकांचा आढावा घेणार
– नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 13 : महानगरपालिका, नगरपालिकांचा विविध बँकांमध्ये ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे. बँकांमधील हा पैसा सुरक्षित असल्याबद्दल योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. यासाठी राज्यातील नगरपालिका, महानगरपालिकांच्या बँकात असलेल्या ठेवींसंदर्भात आढावा घेतला जाईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य हेमंत टकले यांनी राज्यातील नाशिक, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांच्या बँकातील ठेवींसदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना श्री. शिंदे बोलत होते. राज्यातील बँकातील ठेवीसंदर्भात २७ ऑक्टोबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून बँकांमध्ये ठेवी ठेवण्यात येतात. यात अटी व शर्तीचा भंग झाला असल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. बँकांऐवजी ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी शासनामार्फत ‘स्टेट डिपॅाझिट कॅार्पोरेशन’ स्थापन करण्याचा विचार करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, रामहरी रुपनवर, निरंजन डावखरे, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रसाद लाड, अंबादास दानवे आदींनी भाग घेतला.


0 Comments