विकासाचा ध्यास हाच भाजपचा अजेंडा; सभांमध्ये होत असलेली गर्दी विजयाचा विश्वास अधिक दृढ करणारी – आ. किशोर जोरगेवार
◾सभांच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावात
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईक, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार चैनसुख संचेती यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सभा व कॉर्नर बैठकींच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. या सभांमधून विकासकामांच्या आधारे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सभांना होत असलेली नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी विजयाचा विश्वास अधिक दृढ करणारी असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
काल शुक्रवारी विविध प्रभागांतील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच प्रभाग क्रमांक १, १३, ४, १७, १० आणि ७ मध्ये जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांमध्ये बोलताना आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात भारतीय जनता पक्षाने राबवलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला.
बाबूपेठ प्रभागातील सभेत बोलताना ते म्हणाले की, शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बाबूपेठ प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील उड्डाणपुलाची जुनी मागणी पूर्ण करण्यात आली असून महादेव मंदिर परिसरात सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून भव्य अभ्यासिकेची उभारणी करण्यात येत आहे. या अभ्यासिकेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. तसेच धम्मभूमी महाविहार येथे पॅगोडाच्या धर्तीवर विपश्यना केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. बाबूपेठ परिसर हा बहुतांशी नजुल जमिनीवर वसलेला असून लवकरच येथील नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकोरी प्रभागातील सभेत बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जात, पात, धर्म, पंथ यांपलीकडे जाऊन ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या तत्त्वावर काम करत आहे. मुस्लिम समाजासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीर सभांना होत असलेली गर्दी ही विजयाचा विश्वास अधिक बळकट करणारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय जनता पक्ष पूर्णपणे एकजुटीने काम करत असून प्रत्येक प्रभागात जनसेवेची भावना असलेले उमेदवार दिले आहेत. प्रभागातील समस्या महानगरपालिका प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना आमदार जोरगेवार म्हणाले की, काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. ते खोट्या घोषणांचा पाऊस पाडून निघून जातील आणि पुढील पाच वर्षे प्रभागात फिरकणारही नाहीत. त्यामुळे कोणत्याही खोट्या आश्वासनांना बळी न पडता विकासाच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सर्व सभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.








0 Comments