चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक’ असे नामकरण करा








चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक’ असे नामकरण करा..

◾भारतीय जनता पार्टीची मागणी, मनपा आयुक्तांना दिले निवेदन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या दळणवळण केंद्रांपैकी एक असलेल्या वरोरा नाका चौकाचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक’ असे करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना देण्यात आले आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा अध्यक्षा छबू वैरागडे, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, महामंत्री सविता दंढारे, तेजा सिंग, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, विमल कातकर, भाग्यश्री हांडे, आशु फुलझेले, राकेश बोमनवार, अक्षय धोटे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नागपूरनंतर बाबासाहेबांनी चंद्रपूरमध्ये दुसऱ्यांदा धम्मदीक्षा दिली होती. त्यामुळे ही भूमी बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धास्थान मानली जाते. या दीक्षाभूमीपासून हाकेच्या अंतरावर असलेला वरोरा नाका चौक शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक असे केल्यास त्याला अधिक योग्य आणि सन्मानास्पद स्वरूप प्राप्त होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या नामकरणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव होईल. तसेच, त्यांच्या विचारांतून सामाजिक समरसता, बंधुता आणि ज्ञानाचा संदेश जनमानसात पोहोचेल. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या चंद्रपूर शहराला हे नामकरण ऐतिहासिक ओळखही प्राप्त करून देईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच संबंधित ठिकाणी आकर्षक फलक, स्मृतिचिन्हे व माहिती फलक बसवून हे स्थान पर्यटकांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी बनवता येईल, असेही भारतीय जनता पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments