‘हर घर तिरंगा’ अभियानाचा अधिकाऱ्यांकडून आढावा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : केंद्र शासनाकडून 2 ते 15 ऑगस्ट या दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम / उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज (दि.11) जिल्ह्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांचा यंत्रणेकडून आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ. व्यवहारे यांनी संवाद साधून ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. जिल्हास्तरापासून ग्रामस्तरापर्यंत सर्वांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, सर्व विभागांनी यात पुढाकार घ्यावा, शाळांमध्ये या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर वत्कृत्व स्पर्धा आदींचे आयोजन करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी तिरंगा रॅलीचे आयोजन करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचे तीन टप्पे असून 2 ते 8 ऑगस्ट पहिला टप्पा, 9 ते 12 ऑगस्ट दुसरा टप्पा तर 13 ते 15 ऑगस्ट तिसरा टप्पा आहे. तिस-या टप्प्यामध्ये ध्वजारोहण, समारंभ, सर्वांचा सहभाग, शहरी आणि ग्रामीण भागात विविध उपक्रमांना प्रसिध्दी, तिरंगासोबत सेल्फी असे उपक्रम आहेत. तर पहिल्या आणि दुस-या टप्प्यामध्ये शाळेच्या भिंती आणि फलक तिरंगा प्रेरीत कलाकृतींनी सजवणे, तिरंगा प्रदर्शनाचे आयोजन, विविध स्पर्धा आदींचा समावेश होता.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व विभाग प्रमुख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
0 Comments