जागतिक आदिवासी दिन सांस्कृतिक अभिमानाचा दिवस – आ. किशोर जोरगेवार
◾जागतिक आदिवासी दिनानिमित्त जलनगर वार्ड येथे कार्यक्रमाचे आयोजन, सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जागतिक आदिवासी दिन हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, आपल्या आदिवासी समाजाच्या शौर्य, परंपरा, संस्कृती आणि योगदानाची आठवण करून देणारा प्रेरणादायी क्षण आहे. येथे सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. आदिवासी समाज हा आपल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी भाग असून, जागतिक आदिवासी दिन हा सांस्कृतिक अभिमानाचा दिवस असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूरातील जलनगर वार्ड येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील सौंदर्यीकरणाच्या कामाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला शहर अध्यक्षा छबु वैरागडे, माजी नगरसेविका शीतल आश्राम, पुष्पा उराडे, राकेश बोमनवार, अनिल सुरपाम, किसन सुरपाम आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आदिवासी समाजाची लोकपरंपरा, नृत्य, गाणी, सण-उत्सव हे केवळ कलात्मक अभिव्यक्ती नसून, ते निसर्गाशी असलेल्या त्याच्या घट्ट नात्याचे प्रतीक आहेत. जगाला पर्यावरण संवर्धन, सुसंवाद आणि सहजीवनाचा संदेश देणारी ही जीवनशैली आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या आधुनिक युगात विकासाच्या वाटचालीसोबत आपल्या आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या पिढ्यांनी जपलेल्या परंपरा, गाणी, वेशभूषा आणि कला या पुढच्या पिढ्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य या क्षेत्रात प्रगती साधताना सांस्कृतिक मुळांचा सन्मान राखणे अत्यंत गरजेचे आहे.
जालनगर वार्डात आदिवासी समाज मेळावा आयोजित करून आपल्या परंपरांचा उत्सव साजरा करण्यात आला. शालेय मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेले नृत्य आपली सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे समोर आणणारे होते. तसेच, सौंदर्यीकरण विकास कामाचे भूमिपूजन करून आपण सामाजिक आणि भौतिक विकासाच्या दिशेनेही एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि समाजबंधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments