धर्मांतरासंदर्भात विदेशी निधी, विशेष विंग व कायदा आवश्यक - MLA Sudhir Mungantiwar
◾आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
◾राज्यात धर्मांतर रोखण्यासाठी ठोस कायदा करण्याची महसूलमंत्री बावनकुळे यांची ग्वाही
मुंबई,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढत्या धर्मांतर प्रकरणांविषयी विधानसभेत आज अत्यंत महत्त्वाची मागणी केली. त्यांनी सरकारचे लक्ष वेधल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ठोस कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
मागील वर्षी महाराष्ट्रातील तब्बल १५१५ संस्थांना विदेशातून निधी प्राप्त झाला. हा निधी धर्मांतरासाठी वापरला जातो का? या संदर्भात विदेशी निधीचा तपशील अधिवेशनाअखेर पटलावर ठेवण्यात येईल का?, असे प्रश्न आ. मुनगंटीवार यांनी उपस्थित केले.
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, 'गृह विभागावर मोठा ताण आहे. त्यामुळे अशा प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विंग स्थापन करावी. इतर राज्यांनी धर्मांतर रोखण्यासाठी कायदे केले आहेत, महाराष्ट्रानेही पावले उचलायला हवीत. सक्तीने किंवा आमिषाने होणाऱ्या धर्मांतर थांबविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी नमूद केले.
या प्रश्नांना उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुधीरभाऊंनी उपस्थित केलेले तिन्ही मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. विदेशी निधीचा स्रोत, उपयोग याची चौकशी होईल, तसेच विशेष विंग स्थापनेचाही विचार केला जाईल. अन्य राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्राने ठोस कायदा आणावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.या तिन्ही मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा करून, राज्यात धर्मांतर करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न निच्छित करु असा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात दिला.
0 Comments