CDCC Bank चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपाची सत्ता
◾अध्यक्षपदी शिंदे तर उपाध्यक्षपदावर डोंगरेंची निवड
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( सिडीसीसी ) गेल्या सात दशकातील इतिहासात पहिल्यांदा भाजपाने एकहाती सत्ता मिळविली असून, अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची अविरोध निवड झाल्याने ही निवडणूकिवर राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चिल्या जात आहे.एकहाती सत्तेच्या यशानंतर भाजपाच्या नेत्यांनी 'राज्यात देवेंद्र व जिल्हा बँकेवर रवींद्र ' विराजमान झाल्याचे सांगत बँकेकडून शेतकरी, गोरगरीब आणि बचत गटांसाठी यापुढे काम होणार असल्याचेही सांगितले.
जिल्हा बँकेतील संचालकपदांच्या निकालानंतर तब्बल 17 संचालकांचे पाठबळ भाजपा समर्थित गटाकडे रवींद्र शिंदे यांच्या पुढाकारातून मिळाल्याने ही निवडणूक अविरोध होईल, असे सांगितले जात होते. दरम्यान, मंगळवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकरीता सभेचे आयोजन केले होते. या दरम्यान, अध्यक्षपदासाठी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांचे नामांकन आले. विरोधी गटाकडून दोन्ही पदांसाठी कोणत्याही संचालकांनी नामांकन दाखल केले नसल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
चंद्रपुरातील सिडीसीसी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर सहकार क्षेत्रातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बँकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. निवड प्रक्रियेनंतर नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार मा. सा. कन्नमवार सभागृहात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित होते. यावेळी आ. कीर्तिकुमार भांगडिया, आ. किशोर जोरगेवार, आ. करण देवतळे, माजी मंत्री रमेशकुमार गजभे, माजी आ. तथा संचालक सुदर्शन निमकर, माजी आ. संजय धोटे, भाजपाचे महानगरअध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह भाजपाच्या गटातील सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसच्या संचालकांनीं केला सत्कार
सिडीडीसी बँकेतील भाजपाच्या गटाला काँग्रेसच्या संचालकांचा छुपा पाठींबा आधीच होता हे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान स्पष्ट झाले.त्यामुळे निवड प्रक्रिया अविरोध झाली. विशेष म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर अनुपस्थित राहिल्या. सत्कार समारंभात काँग्रेसच्या संचालकांनी सहभाग घेतला नाही.त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात आ.भांगडिया यांचा सत्कार करून आपणही नवनियुक्त अध्यक्ष रवी शिंदेंच्या पाठीशी असल्याचे काँग्रेसला दाखवून दिले आहे.
खासदार मॅडमचे स्वप्न भंगले
बँकेच्या निवडणुकीत सुरवातीला 9 संचालक भाजपकडे होते,तर 12 संचालक काँग्रेस कडे होते,असा दावा काँग्रेसने केला होता.यामुळेच अध्यक्षपदाची अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली होती.परंतु उबाठाचे रवींद्र शिंदे मविआतून बाहेर पडले.त्यामुळे खासदार मॅडमचे अध्यक्षपदाचे स्वप्न भंगले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एसआयटी चौकशीला लागणार का ब्रेक..?
काही महिन्यांपूर्वी बँकेतील नोकर भरती प्रकरण चांगलेच गाजले. कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप त्यावेळी झाल्याने,अनेक नेत्यांनी चौकशीची मागणी केली. प्रकरण सरकार समोर गेल्यावर मधातच निवडणूक आली. 8 जुलैला चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली. आता देशात,राज्यात व बँकेत भाजपची सत्ता आहे,अश्या स्थितीत एसआयटी चौकशीला ब्रेक लागणार की काय..? असा प्रश्न नोकर भरतीतील उमेदवारांसह नागरिकांना पडला आहे.
0 Comments